
पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून अवघ्या 40 किलोमीटरवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. कडाक्याच्या थंडीत एक महिन्यापासून सिंघु सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्य़ांशी थेट संवाद साधण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 500 ते 2500 कि.मी.वरील निवडक शेतकऱ्य़ांशी बोलले. नवीन कृषी कायद्याचे फायदे सांगताना पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका केली.
विशेषतः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, पंतप्रधानांनाकडून ‘फोडा आणि दिशाभूल करा’ ही नीती वापरली जात आहे, असा संताप आंदोलनकर्ते शेतकऱ्य़ांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्य़ांशी 80 मिनिटे संवाद साधला आणि नवीन कृषी कायदे फायदेशीर असल्याचे सांगितले. तसेच काही राज्यांतील शेतकऱ्य़ांकडून त्यांचे अनुभव जाणून घेतले. तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर या पाच मंत्र्यांनी विविध राज्यातील शेतकऱ्य़ांशी संवाद साधला.
9 कोटी शेतकऱ्य़ांच्या खात्यात 18 हजार कोटी
दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (पीएम-किसान) दोन हजारांचा हप्ता 9 कोटी शेतकऱ्य़ांच्या खात्यात जमा केला. 18 हजार कोटी रुपये जमा केले आहेत असे मोदी यांनी सांगितले.
ममता बॅनर्जी, काँग्रेस आणि डाव्यांवर टीका
नवीन कृषी कायद्यांचे देशातील बहुतांशी शेतकऱ्य़ांनी स्वागत केल्याचा दावा करताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा लाभ पश्चिम बंगाल वगळता देशातील सर्व छोटय़ा शेतकऱ्य़ांना मिळतो. ममता बॅनर्जी यांच्यामुळे पश्चिम बंगालमधील 70 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. राजकीय कारणामुळे पश्चिम बंगालच्या शेतकऱ्य़ांना लाभ मिळू दिला जात नाही.
पश्चिम बंगालमध्ये ज्या पक्षाची 30 वर्षे सत्ता होती. त्यांनी शेतकऱ्य़ांसाठी काही केले नाही. हाच पक्ष केरळमध्ये सत्तेत आहे. मार्केट कमिटय़ा बंद होतील म्हणून हे लोक आंदोलन करतात. मात्र, केरळमध्ये मंडई का नाही? असा सवाल पंतप्रधानांनी डाव्या पक्षांना केला.
येथील निवडक शेतकऱ्य़ांशी साधला संवाद
हरयाणा 120 कि.मी.
उत्तर प्रदेश 500 कि.मी.
मध्य प्रदेश 800 कि.मी.
महाराष्ट्र 1300 कि.मी.
ओडिशा 1500 कि.मी.
तामीळनाडू 2500 कि.मी.
अरुणाचल 2500 कि.मी.
शेतकरी संतप्त; पंतप्रधानांकडून ‘फोडा आणि दिशाभूल करा’ची नीती
पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना सिंघु सिमेसह देशात अनेक ठिकाणी शेतकऱ्य़ांनी थाळ्या वाजवून आणि घंटानाद करीत निषेध केला.
पंतप्रधान मोदी यांचे भाषण म्हणजे ‘फोडा आणि दिशाभूल करा’ असे आहे. पंतप्रधानांकडूनच शेतकऱ्य़ांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘एमएसपी’ राहणार असे पंतप्रधान म्हणतात मग त्याची कायद्यात तरतुद का नाही? असा सवाल शेतकरी नेते अभिमन्यु कोहार यांनी केला. आमच्या आंदोलनाबाबत गैरसमज पसरविले जात आहेत. या आंदोलनात राजकीय पक्षांना प्रवेश नाही असे त्यांनी सांगितले.

























































