
बीड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर भगवा फडकला पाहिजे, त्यासाठी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जोरदार तयारीला लागावे, समाजकारणामध्ये ग्रामपातळीपासून शहररापर्यंत काम करणाऱ्या शिवसैनिकाला न्याय देण्याची ही वेळ आहे. जी ग्रामपंचायत बिनविरोध निघेल त्या ग्रामपंचायतसाठी 51 लाख रूपयाचा अतिरिक्त विकासनिधी दिला जाणार आहे. येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत बीड जिल्हा भगवामय करा, असे आवाहन बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी केले.
बीड जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी बीड येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव बोलत होते. पुढे ते म्हणाले, शिवसेनेने कायम विकासालाच प्राधान्य दिले आहे. बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी ताकदीने कामाला लागावे, जी ग्रामपंचायत बिनविरोध निवडून येईल त्या ग्रामपंचायतला 51 लाख रूपयांचा अतिरिक्त विकास निधी देण्याची घोषणा नुकतीच केली आहे.
कोरोनाच्या या भयंकर संकटात शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जपत सामान्य नागरिकांना मोठी मदत केली होती. मदतीचा हात दिला होता. शिवसेना नेहमीच समाजकार्यामध्ये अग्रेसर असते. या समाजकारणाचा राजकीय फायदा घ्यायला काहीच हरकत नाही असे ते म्हणाले. तत्पूर्वी माजी आमदार बदामराव पंडित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, गिरीष देशपांडे यांची भाषणे झाली.
यावेळी बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, उपजिल्हप्रमुख बंडू पिंगळे, शहरप्रमुख सुनिल सुरवसे, नितीन धांडे, किसान सेनेचे जिल्हासंघटक परमेश्वर सातपुते, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे, बप्पासाहेब घुगे, गोरख सिंघन, वैजीनाथ तांदळे, महिला आघाडीच्या जिल्हासंघटक संगितताई चव्हाण, चंद्रकला बांगर, युवा सेना जिल्हाधिकारी सागर बहिर, भीमराव वाघचौरे, गणपतराव डोईफोडे, रामसिंग टाक यांच्यासह बीड, आष्टी, गेवराई, शिरूर आणि पाटोदा येथील पदाधिकारी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रत्येक शिवसैनिक कामाला लागला आहे. बहुतांश ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकेल अशी तयारी पूर्ण झाली आहे. शिवसेनेचा सरपंच होणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीला 25 लाखांचा विकास निधी आम्ही मिळवून देऊ, असा शब्द जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिला. तर माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, प्रत्येक निवडणुकीमध्ये आपली जिवाची बाजी लावून हिरारीने भाग घेणाऱ्या सामान्य शिवसैनिकांची ही निवडणूक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातूनच सामान्य शिवसैनिकांना मान आणि सन्मान मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आता कठोर मेहनत घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.































































