कलारंग – मालवणचा दशावतारी बालगंधर्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंदन विचारे

‘कोकणचा बालगंधर्व’ असा ज्याचा उल्लेख केला जातो ते दशावतारी कलाकार म्हणजे ओमप्रकाश चव्हाण. दशावतार नाटकांची बिकट स्थिती असताना ओमप्रकाश यांनी आपले जीवन या कलेला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. देशभरातील अनेक पुरस्कार त्यांना लाभले. मात्र या कलाकाराने आपलं संपूर्ण आयुष्य कोकणच्या मातीत वाहून घेतलं.

तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकून घेतलं या गाण्याचे बोल ज्याच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरले होते ते कोकणच्या मातीतील सुप्रसिद्ध दशावतारी बालगंधर्व म्हणजेच ओमप्रकाश यशवंत चव्हाण. एका भटकंतीदरम्यान आंबडोस या मालवणात गावी त्यांना भेटण्याचा योग्य आला. साधं राहणीमान असलेली ही व्यक्ती दशावतरात एंट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट अन् शिटय़ांचा वर्षाव घेणारा कोकणच्या मातीतला दशावतारी सुपरस्टार म्हणजे ओमप्रकाश चव्हाण हे आम्हाला माहीतच नाही ते लक्षात येतं जुन्या वर्तमानपत्रांत आणि मासिकांतील लेख वाचल्यानंतर.

ओमप्रकाश चव्हाण यांचा जन्म मुंबईच्या लालबागमधला. शिक्षण जेमतेम 8 वीपर्यंत. बालपण सारं गेलं ते मालवणमधल्या आंबडोस गावी. त्यांचे वडील यशवंत चव्हाण हे भजनीबुवा अन् बालगंधर्वांचे निस्सिम चाहते. ते ओमप्रकाश यांस लहानपणी बालगंधर्वांच्या गोष्टी सांगत असत. पुढे त्याच गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर पडत गेला. लहानपणापासूनच ओमप्रकाश हुबेहूब नकला करण्यात हुशार. ओमप्रकाश 15 वर्षांचे असताना त्यांच्या वडीलांचं देहावसान झालं. वयाच्या 19व्या वर्षी परिस्थितीमुळे ओमप्रकाश यांनी आपल्या अंगीच्या कलागुणांना वाव देण्याचं ठरवत नाटय़भूमीवर यायचं ठरवलं. सुरुवातीलाच त्यांना पहिली भूमिका मिळाली ती स्त्री पात्राची. ओमप्रकाश यांनी त्या भूमिकेला योग्य न्याय दिला अन् इथूनच सुरुवात झाली ओमप्रकाश यांच्या रंगमंचावरील कारकिर्दीला.

पुढे बाबी नालंगांच्या दशावतारी मंडळात ते गेले. बाबी नालंगांनी त्यांचं नाव ऐकून तातडीने ओमप्रकाश यांना आपल्या दशावतारी कंपनीत बोलावलं. रामायण, गरुड गर्वहरण, महाभारत, एकनाथी भागवत, नवनाथ कथासार अशा विविध पुराणांवर आधारित दशावतारात त्यांनी कुंती, सीता, वत्सला, शर्मिला, देवकी, मायावती, पिंगला, अप्सरा, सती महानंदा अशी पैक स्त्री पात्रे रंगवली. त्यातील त्यांची सती महानंदा ही विशेष गाजलेली अन् प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली भूमिका. ओमप्रकाश यांना या दशावतारी लोककलेत बहुमोल मार्गदर्शन लाभले ते गोविंद तावडे आणि बाबल नाईक यांचे. त्यांनी वालावलकर, नाईक मोचेमाडकर, बाळकृष्ण गोरे यांच्या दशावतारी मंडळात हजारो प्रयोग केले.

दशावतार म्हटलं की शेकडो प्रयोग अन् दौरे. पाच सहा महिने घराबाहेर. घरच्यांचं दर्शन होई ते पाच सहा महिन्यांनीच. ओमप्रकाश यांचा संसार म्हणजे दोन मुलगे आणि एक मुलगी असा. त्यांच्या पत्नीने समर्थपणे घरची जबाबदारी पार पाडली अन् मुलांना शिकवून मोठे केले. दशावतारात काम करणाऱया मंडळींना त्यावेळी ‘रात्रीचा राजा अन् सकाळी माथ्यावर बोजा’ असं हिणवलं जाई. त्यात स्त्री पात्र साकारणाऱया कलाकाराच्या वाटय़ाला बाहेर बरेच वाईट अनुभव येत. जातिवंत सौंदर्य त्यांना लाभलंच होतं अन् त्याचसोबत गोड गळाही. त्यांनी रंगवलेली स्त्रीपात्र इतकी उत्कृष्ट की ते मूळ पुरुष आहेत यावर विश्वासच बसू नये. त्यांच्या याच स्त्रीपात्र सौंदर्याने अन् गोड गळ्याने त्याकाळी कित्येकांना भुरळ घातली.

एकदा परळच्या कामगार वस्तीत मालवणी जत्रेनिमित्त दशावतार आयोजित केला होता. दशावतारातील ओमप्रकाश यांची स्त्री भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली. ज्यांना तिकिटं मिळाली नाही त्यांनी बाहेर आरडाओरड सुरू केली अन् मग आत उभे राहून दशावतार बघण्याची परवानगी त्या प्रेक्षकांना देण्यात आली. दुसरा अनुभव असा की, दादर येथील एका प्रयोगाला प्रख्यात ऑर्गनवादक गजाननबुवा बोरकर आलेले. त्यांनी ओमप्रकाश यांच्या भूमिकेचे विशेष काwतुक करत त्यांना सत्तर वर्षे मागे नेल्याचे सांगितले. गजाननबुवा बोरकर ही साधीसुधी व्यक्ती नव्हेत, ते त्यावेळी बालगंधर्वांसोबत ऑर्गन वाजवायचे.

ओमप्रकाश यांच्या गाजलेल्या स्त्री भूमिकांमुळे प्रेक्षक, समीक्षक यांनी त्यांना दशावतारातील लावण्यवती अन् दशावतारातील बालगंधर्व ही पदवी बहाल केली. दशावतारात सर्वाधिक मानधन अन् एंटीलाच टाळ्यांचा कडकडाट, शिटय़ांचा पाऊस घेणारी एकमेव व्यक्ती. कामगार कल्याण मंडळाचे दशावतारी नाटय़ स्पर्धेत सलग सात वर्षे स्त्री भूमिकेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घेणारे ओमप्रकाश हे एकमेवच. त्यांच्या स्त्री भूमिका मुंबई, कोकण, गोवा, हैदराबाद, दिल्लीतच नव्हे तर एडनबर्गपर्यंत प्रेक्षकांनी अनुभवल्या.

2016 साली गोवा डिचोली येथे दशावताराचा प्रयोग सुरू असताना त्यांना रंगमंचावरच हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांच्यावर अँजियोप्लास्टी झाली अन् पुन्हा हा जातिवंत कलावंत प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी, टाळ्यांचा कडकडाट अनुभवण्यासाठी रंगमंचावर दाखल झाला. एका जुन्या लेखात लिहिल्याप्रमाणे त्यांच्या पत्नीने त्यांची एकही भूमिका पाहिली नाही.

व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याची ओमप्रकाश यांना खूप इच्छा होती पण ती काही पूर्ण होऊ शकली नाही. दशावतारात स्त्री भूमिका करण्यापलीकडे ओमप्रकाश हे गणेशमूर्ती बनवण्याचा छंदही जोपासतात अन् त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाहही चालतो. सरकारने काहीसे स्त्री पात्रे रंगविणाऱया, फारशी प्रसिद्धी न लाभलेल्या या जातिवंत कलावंताची दखल घेऊन त्यांना मोठा पुरस्कार देता येईल का याचा विचार जरूर करावा. बालगंधर्वांना पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही, पण कोकणच्या मातीतील दशावतारी बालगंधर्व जवळून पाहण्याचे, त्यांची मुलाखत घेण्याचे अहोभाग्य मला लाभले हेच खूप.