विद्युतीकरणामुळे रेल्वेची वार्षिक 14,500 कोटींची इंधन बचत, नोव्हेंबरपर्यंत 66 टक्के रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2030 झीरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी रेल्वेने 2023 पर्यंत आपल्या रेल्वे मार्गांचे शंभर टक्के विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य आखले असून नोव्हेंबर 2020 पर्यंत 66 टक्के रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर इंधन खर्चात वर्षाला 14,500 कोटीं रूपयांची बचत होणार आहे.

रेल्वेने आपल्या संपूर्ण बॉर्ड गेज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या कामाचा वेग 2014-15 मध्ये 1176 कि.मी. असा होता. 2018-19 मध्ये तो 5276 कि.मी. इतका वाढला. तर 2019-20 मध्ये कोविड प्रादुर्भावातही तो 4378 कि.मी. इतका झाला. नोव्हेंबर 2020पर्यंत एकूण ही वाढ 1682 कि.मी.इतकी भरते.

एकदा का विद्युतीकरण पूर्ण झाले तर हिंदुस्थानी रेल्वेचा समावेश जगातील मोजक्या  जीवाश्म इंधनावर अवलंबून नसलेल्या रेल्वे सेवेत होणार आहे. शंभर टक्के विद्युतीकरणानंतर इंधनावर खर्च होणाऱया वार्षिक 14,500 कोटी रूपयांची बचत होणार आहे. 2023 पर्यंत शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण करण्याबरोबरच रेल्वेने आपली मालमत्तेचा वापर अक्षय ऊर्जेसाठीही करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी रेल्वेने आपली गरज भागविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर 1.5 मेगावॅट ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी केली असून 2023 पर्यंत 20 गिगावॅट सौर ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य गाठण्याच्या प्रकल्पाचाच हा एक भाग आहे. रेल्वेच्या 960 महत्वाच्या इमारतींवर 105.7 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारले आहेत. तर 103.4 मेगावॅट क्षमतेचे पवन चक्कीचे प्रकल्पही उभारले आहेत. सौर ऊर्जेपासून ट्रक्शन पॉवरला वीज पुरविण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबविला असून सुरूवातीला 1.6 गिगावॅट प्रकल्पासाठी टेंडर काढले असून 2023 पर्यंत 30 गिगावॅट वीज पुरविली जाणार आहे.