मेकर कंपनीचा 54 कोटींचा घोटाळा, कंपनीच्या मालमत्तेवर टाच आणण्याच्या दृष्टीने तपास!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैशांच्या ठेवीवर अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांच्या 54 कोटींच्या ठेवी गडप करणाऱया मेकर कंपनीच्या मालमत्तेवर टाच आणण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे तसेच याप्रकरणी एकास अटकही करण्यात आली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे विभागाच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली.

सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथील शेतकऱयांना शेती व बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीवर मिळणारे अधिक व्याजाचे आमिष दाखवून मेकर कंपनीने 54 कोटींचा गंडा घातला. याप्रकरणी कंपनीचे प्रवर्तक रमेश वळसे पाटील आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका संजय केरवा यांच्यासह 94 गुंतवणूकदारांनी अॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत हायकोर्टात केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक एस. एम. यादव हे न्यायालयात स्वतः हजर होते. त्यांनी याबाबतचा तपास अहवाल कोर्टात सादर करून कोल्हापूर येथील कंपनी चालक पुरुषोत्तम हसबनीस याला अटक केल्याची माहिती दिली तसेच याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली.

याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. धैर्यशील सुतार यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की, घोटाळय़ाची व्याप्ती ही कोल्हापूर जिह्यापुरती मर्यादित नसून सांगली व इतर जिल्हय़ांतील ठेवीदारांचीही फसवणूक झाली आहे. कंपनीच्या केवळ तीनच मालमत्ता जप्त केल्या आहेत; परंतु अद्याप संचालक व संबंधितांची बँक खाती गोठविण्यात आलेली नाहीत.

हायकोर्टाने याची दखल घेत कंपनीची मालमत्ता जप्त करण्याची पुढील कारवाई करण्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, करवीर तसेच इचलकरंजीचे प्रांत अधिकारी यांना प्रतिवादी करून त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले व तीन आठवडय़ांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना देत हायकोर्टाने सुनावणी 21 जानेवारीपर्यंत तहपूब केली.