मुंबईची क्षयरोग, कुष्ठरोग मुक्तीकडे वाटचाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना नियंत्रणात आला असताना मुंबईने आता क्षयरोग आणि कुष्ठरोग मुक्तीकडे वाटचाल केली असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. पालिकेने 1 डिसेंबरपासून मुंबईत केलेल्या सर्वेक्षणात ‘टीबी’साठी 50 लाख नागरिकांची तपासणी केली असून यात फक्त 435 क्षयरोगी आढळले असून कुष्ठरोगाच्या दृष्टीने केलेल्या 44 लाख नागरिकांच्या तपासणीत केवळ 12 रुग्ण आढळले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत क्षयरोग, कुष्ठरोगाच्या उच्चाटनासाठी पालिकेच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या घरोघरी सर्वेक्षण मोहिमेप्रमाणे टीबी, लेप्रसीसाठी सर्वेक्षण करण्यात आले. पालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात आले. या मोहिमेत 1 डिसेंबरपासून केलेल्या या सर्वेक्षणात टीबीसाठी 50 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये चार हजार संशयित आढळले होते. त्यांची तपासणी केली असता 435 जण क्षयरोगी आढळले आहेत. तर लेप्रसीसाठी 44 लाखांच्या तपासणीत 984 संशयित आढळले. यात केवळ 12 कुष्ठरोगी आढळले आहेत. बाधित रुग्णांवर पालिकेच्या माध्यमातून मोफत उपचार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.

ही लक्षणे दिसल्यास संपर्क साधा

क्षयरोगामध्ये 14 दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असणे, दोन आठवडय़ांपेक्षा अधिक काळ ताप असणे पिंवा सायंकाळच्या वेळेस ताप येणे, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकीमधून रक्त पडणे, छातीत दुखणे, मानेवर सूज असणे अशी लक्षणे दिसतात. अशी लक्षणे दिसल्यास संबंधितांनी तातडीने पालिका पिंवा नजीकच्या सरकारी रुग्णालयात तातडीने संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

कुष्ठरोगामध्ये त्वचेवर लालसर चट्टे, संबंधित जागी घाम न येणे, जाड, बधिर तेलकट त्वचा, कानाच्या पाळ्या जाड, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहात-पायावर मुंग्या, हाता-पायात अशक्तपणा, त्वचेवर थंड-गरम संवेदना न जाणवणे अशी लक्षणे आढळून येतात.

सर्वेक्षण मोहीम 31 डिसेंबरपर्यंत वाढवली!

क्षयरोग-कुष्ठरोग शोधमोहिमेची सुरुवात 1 डिसेंबरला करण्यात आली असून पालिका संपूर्ण पालिका क्षेत्रात सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी ही मोहीम 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची माहितीही काकाणी यांनी दिली. या सर्वेक्षण मोहिमेत पालिका आणि स्वयंसेवकांची 3 हजार 451 पथके सहभागी झाली असून घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. हे सर्वेक्षण सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत करण्यात येत असून नागरिकांनी पथकातील कर्मचाऱयांना सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे.

टीबी   :      50 लाख तपासण्या – 435 रुग्ण

लेप्रसी   :    44 लाख तपासण्या – 12 रुग्ण