लॉकडाऊनमध्ये हिंदुस्थानकडून 554 कोटी रुपयांच्या दुग्धपदार्थांची निर्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे जगभरात कडकडीत लॉकडाऊन असतानाही हिंदुस्थानने तब्बल 554 कोटी रुपयांच्या दुग्धपदार्थांची 110 देशांना निर्यात केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक संयुक्त अरब अमिरातला 154 कोटी रुपयांची निर्यात आहे. दुग्धपदार्थांच्या निर्यातीमध्ये दुधाची भुकटी, बटर, तूप आदींचा समावेश आहे.

हिंदुस्थानातून दरवर्षी सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या दुग्धपदार्थांची निर्यात केली जाते. मात्र यंदा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन लागल्याने हवाई वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे दुग्धपदार्थांची निर्यात कशी करायची हा प्रश्न राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डासमोर होता, मात्र विविध देशांमधून दुग्धपदार्थांना मोठी मागणी असल्याने महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांनी अॅग्रीकल्चर अॅण्ड प्रोसेसड फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटीच्या मदतीने दुग्धपदार्थांची निर्यात केली आहे. संयुक्त अरब अमिरातीला 151 कोटी रुपयांच्या दुग्धपदार्थांची निर्यात केली असून अमेरिकेला 110 कोटी रुपये, भुतान 78 कोटी रुपये, सिंगापूर 53 कोटी रुपये, सौदी अरेबिया 39 कोटी रुपये, ऑस्ट्रेलियाला 37 कोटी रुपयांची निर्यात केली आहे.

चार वर्षांत संयुक्त अरब अमिरातला दीड हजार कोटीच्या तुपाची निर्यात

हिंदुस्थानने गेल्या चार वर्षांत 5500 हजार कोटी रुपयांचे तूप जगभरात निर्यात केले आहे. त्यापैकी एकटय़ा संयुक्त अरब अमिरातला 1521 कोटी रुपयांचे तूप पाठवले आहे. तर लॉकडाऊन काळात सौदीला 74 कोटी रुपयांच्या तुपाची निर्यात केली आहे.