
बिहारमध्ये सत्ताधारी एनडीएमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. भाजप आणि जदयूमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून खेचाखेची सुरू आहे. त्यातच जदयूचे 17 आमदार नितीश सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असून लवकरच ते राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करणार असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट राजद नेते माजी मंत्री श्याम रजक यांनी केला आहे.
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱया भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली खरी, मात्र पडद्याआड राजकीय घडामोडी सुरूच आहेत.
विरोधी पक्षात असणाऱया राजदने सत्तेत येण्याची आशा अजूनही सोडलेली नाही. संयुक्त जनता दलाचे 17 आमदार आपल्या संपर्कात आहेत. भाजपच्या कार्यशैलीमुळे नाराज असलेले हे आमदार राजदमध्ये येण्यास इच्छुक आहेत, पण त्यांना तूर्तास थांबण्यात आल्याचे रजक यांनी म्हटले आहे.
पक्षांतर बंदीची अडचण?
मुख्यमंत्री नितीशकुमार यांची साथ सोडून जदयुचे हे 17 आमदार राजदमध्ये येण्यास तयार आहेत. मात्र त्यांना आताच पक्षात घेतले तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द होऊन आमदारकी धोक्यात येऊ शकते. 25 ते 26 आमदार एकाच वेळी बाहेर पडून राजदमध्ये आले तर त्यांचे सदस्यत्व कायम राहील, असेही रजक म्हणाले.
जदयूत भाजपविरोधात नाराजी वाढतेय
अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जदयुचे सहा आमदार पह्डले. त्यामुळे जदयुमधून नाराजीचा सूर उमटताना दिसत असून नितीशकुमारदेखील यामुळे नाराज झालेत. भाजपकडून बिहारमध्ये सुरू असलेल्या दबावाच्या राजकारणामुळे जदयुचे आमदार त्रस्त आहेत.


























































