लेख – उगवतीची उत्सुकता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ष संपते आहे हे समजून अगणित माणसांच्या मनाला तसा दिलासाच मिळत असणार. कारण अवघे वर्षच विमनस्क आणि विषण्णता यातच गेले. प्रत्येकाची मुस्कटदाबी झाली आणि प्रत्येक जिवाचा तितकाच क्लेशदायक असा कोंडमाराही झाला. घरातून बाहेर पडणे नाही आणि बाहेर पडलेला माणूस सुखरूपपणे घरी कसा येईल यातच आपले दिवस आणि महिने कुरतडले गेले. त्यामुळे जी अगतिकता सहन करावी लागली ती कल्पनेबाहेरचीच होती. अशा वर्षाचा अस्त होतो आहे हे निश्चितच तसे दिलासा देणारेच म्हटले पाहिजे. याचबरोबर उद्या उगवणारे वर्ष कसे असेल याबद्दलची उत्सुकता मात्र प्रत्येकाच्या मनात तितकीच असणार. म्हणजे एक व्यथेचे आणि वेदनेचे वर्ष सरले व क्षितिजावर नवे वर्ष उगवत असताना त्याचे रंगरूप कसे असेल याबद्दल सर्वांच्याच मनात अपार उत्सुकता असणार. ही उत्सुकताच माणसाला जगण्यासाठी बळ देत असते. उद्याच्या उदरात काय दडले आहे? हे समजण्यासाठी मन उत्सुक असणे हा मानवी स्वभाव आहे. यातूनच माणूस साहित्य आणि वेगवेगळ्या कलांच्याकडे ओढत असतो.

बनगरवाडीसारखी वेगळ्या गुणवत्तेची कादंबरी लिहिणाऱया व्यंकटेश माडगुळकर यांनी एका प्रादेशिक संमेलनात असे म्हटले होते की, काल काय घडले हे उद्या मित्राला सांगण्याकरिता आपले मन जेवढे उत्सुक असते तेवढेच ते साहित्यालाही तितकेच आश्वासक वाटत असते. अशा संजीवक मनातूनच साहित्याला प्रेरणा मिळत असते. खरेतर बऱयाच वेळा आपण म्हणत असतो की, उद्याचा दिवस काय आजच्या सारखाच असायचा, त्यात फरक तो काय असणार? पण प्रत्येक दिवसाला त्याचा चेहरा असतो आणि त्याचे म्हणून एक सर्वस्वी वेगळे असे सत्वपण असते. असा दिवस उगवतीतून उमलत असतो आणि मावळतीत विसर्जित होत असतो. त्यामुळे उगवती आणि मावळती यामधला दिवस हा सर्वस्वी आपला असतो. अशा दिवसांचा भला मोठा समुदाय होतो आणि एक वर्ष जन्माला येत असते. वर्षामागून वर्षे जात असतात. एका नाटकात एक छान ओळ आहे. त्यात असे म्हटले आहे की, लाटेमागून लाट धावते तरी किनारा भेटेना. आपले नेमके तसेच असते. दिवसामागून दिवस जात असतात तरीपण आपल्या मनातील हुरहुर मात्र काही संपत नसते. अशी हुरहुर लागून राहणे हे जरी चैतन्याचे लक्षण असले तरी प्रसंगी त्यातूनच विवंचना पण निर्माण होत असतात. यामागे जी दडून राहिलेली असते ती अधिरता होय. या अधिरतेपोटीच आपण काळ मागे टाकत असतो आणि नव्या काळाला कवेत घेण्याचा परोपरीने प्रयत्न करत असतो. त्यामुळे एका मावळतीतून नवी उगवती असे कालचक्र सदैव फिरत राहत असते. आला क्षण जाणार हे प्रत्येकालाच कळत असते. पण त्याचबरोबर तासामागून तास आणि घटिकेमागून घटिका हे अव्याहतपणे सुरूच असते. बऱयाच वेळा आपण म्हणत असतो की, दिवस फार झपाटय़ाने गेले. खरे तर दिवस हे त्यांच्या पद्धतीनेच जात असतात. झपाटा असतो तो आपल्या मनाचा आणि याच मनाचा एक रेंगाळणारा असा भाव समोर आला की, दिवस रेंगाळत चालले आहेत असे आपण म्हणत असतो. या दोहोतून आपण आपली उत्सुकता टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. म्हणून जे गेले ते गेले. म्हणजे बिते हुए दिन हे मागे पडणार. गुजरा हुआ जमाना तसाच मागे जाणार. म्हणून आपण असा विचार केला पाहिजे की, छोडो कल की बाते, कल की, बात पुरानी म्हणून तर येणाऱया उगवतीची उत्सुकता मनात टिकून असली पाहिजे. कारण कवींनी असे म्हणून ठेवले आहे की, कालच्यापेक्षा आज चांगले असते आणि आजच्यापेक्षा उद्या निश्चितच आणखीन चांगले असेल म्हणून तर उगवतीची उत्सुकता आपणास आणखी एक नवे जगणे शिकविणारी असते.

वैजनाथ महाजन