
लग्नाचे किस्से ऐकावे तेवढे कमीच असतात. लग्नसोहळ्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. त्यासाठी नवनवीन संकल्पना राबवल्या जातात. अशाच एका हटके संकल्पनेमुळे मध्यप्रदेशातील इंदौर शहरातील एक लग्नसोहळा सध्या चर्चेत आला आहे. या लग्नाची थीम होती शून्य कचरा म्हणजेच झिरो वेस्ट. त्यानुसार पर्यावरणपूरक, कचरामुक्त असा सोहळा पार पडला.
इंदौरच्या माचल गावातील एका लग्नाची ही अनोखी गोष्ट सध्या घरोघरी सांगितली जात आहे. इंजिनीयर रोहित अग्रवाल आणि इंटिरियर डिझायनर पूजा गुप्ता यांनी शून्य कचरा संकल्पनेवर नुकतीच लग्नगाठ बांधली. त्यांनी लग्नाच्या पत्रिका न छापता सर्वांना ई-कार्ड पाठवले. लग्नस्थळी अगदी सजावट करतानादेखील कचरा होणार नाही याची काळजी घेतली होती.
मंडपातच कचऱयाची विल्हेवाट
साधारपणे लग्नसोहळ्यात दोन हजार किलोपर्यंत कचरा जमा होतो. मात्र दोन दिवस चाललेल्या रोहित-पूजाच्या लग्नसोहळ्यात फक्त 40 किलो ओला कचरा जमा झाला. लग्न समारंभास्थळीच हा कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित करण्यात आला. लग्नात जेवणासाठी स्टीलच्या ताटांचा वापर करण्यात आला. तसेच पाहुण्यांनाही जेवण वाया न घालवण्याचा आग्रह करण्यात आला होता.
अशी सुचली कल्पना
रोहितची एकदा समाजसेवक रोहित पटला यांच्यासोबत एका कार्यक्रमात भेट झाली. यावेळी ’कचरा करून, लग्नाचा कचरा करू नका,’ या विषयावर त्यांनी मांडलेले विचार रोहितला पटले. आपणही जेव्हा कधी लग्न करू तेव्हा लग्नात कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही, याची काळजी घेऊ असे रोहितने ठरवले. लग्न ठरल्यावर रोहितने होणारी पत्नी पूजाला झीरो वेस्ट थीमबाबत सांगितले. तिनेही लागलीच या थीमसाठी होकार दिला.

























































