नगर, पारनेर, राहुरीतील ‘ती’ 23 गावे पुन्हा रडारवर; लष्करी प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकाऱयांनी काढली अधिसूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना अधिनियमाने प्रदान केलेल्या अधिकारान्वये के. के. रेंजच्या गोळीबार क्षेत्रालगतचे क्षेत्र 15 जानेवारी 2021 ते 14 जानेवारी 2026 या कालावधीत जिवंत दारू गोळ्यासह मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी अधिसूचना क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सरावादरम्यान ग्रामस्थांचे स्थलांतर टाळण्यासाठी तीन तालुक्यांतील 23 गावांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. त्यामुळे के. के. रेंजचा प्रश्न सुटला नसल्याचेच जिल्हा प्रशासनाने अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केले आहे.

के. के. रेंजसाठीच्या वाढीव क्षेत्रात नगर तालुक्यातील सहा, राहुरी तालुक्यातील 12 आणि पारनेर तालुक्यातील 50 गावांचा समावेश आहे. या तीन तालुक्यांतील 10 हजार 798.96 हेक्टर खासगी जमीन, 3 हजार 597.11 हेक्टर सरकारी जमीन व 11 हजार 223.62 हेक्टर वन जमीन आहे. नगर तालुक्यातील देहरे, इस्लामपूर, शिंगवे, नांदगाव, सुजलपूर, घाणेगावमधील जमिनींचा समावेश आहे. या गावांतील 991.27 हेक्टर खासगी जमीन क्षेत्र, 150.85 हेक्टर सरकारी जमीन व 113.11 हेक्टर वन जमिनीचा यात समावेश आहे.

राहुरी तालुक्यातील बाभुळगाव, जांभुळबन, जांभळी, वरवंडी, बारागाव नांदुर, कुरणवाडी, घोरपडवाडी, चिंचले, गडाखवाडी, दरडगावथडी, वावरथ या गावांतील जमिनींचा समावेश आहे. या गावांतील 4 हजार 130.64 हेक्टर खासगी जमीन, 2 हजार 260.52 हेक्टर सरकारी जमीन व 5 हजार 657.76 हेक्टर वन जमीन आहे. पारनेर तालुक्यामधील वनकुटे, पळशी, वडगाव सावताळ, गाजदीपूर, ढवळपुरी या गावांतील जमिनीचा समावेश आहे. या गावांतील 5 हजार 677.05 हेक्टर खासगी जमीन, 1 हजार 185.74 हेक्टर सरकारी जमीन व 5 हजार 452.75 हेक्टर वन जमीन आहे.

या गावांमधील समाविष्ट असलेले सर्व्हे क्रमांक, गट क्रमांक व फॉरेस्ट कंपार्टमेंट क्रमांकनिहाय यादी संबंधित तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय व वन परिक्षेत्र अधिकाऱयांच्या कार्यालयातदेखील प्रसिद्ध केली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिसूचनेत म्हटले आहे.

सरावाच्या दिवशीच गावे खाली करण्यात येणार

ही ठिकाणे ही वेगवेगळ्या दिवसांकरिता वेगवेगळी लक्ष्ये साधण्यासाठी प्रशिक्षणातील विविधता आणि त्याचबरोबर एखादे विशिष्ट गाव अथवा गावाच्या समूहाचे सततचे स्थलांतर टाळण्यासाठी निवडण्यात आली आहेत. या क्षेत्रातील फक्त अशीच गावे व धोकादायक क्षेत्र म्हणून असलेली क्षेत्रे ही सरावासाठी आवश्यक दिवशीच महसूल अधिकाऱयांमार्फत धोकादायक क्षेत्र म्हणून नोटीस देऊन खाली करण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत या क्षेत्रातील सर्व गावांबाबत वरील संपूर्ण कालावधीदरम्यान स्थलांतराची कारवाई केली जाणार नाही, असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.