
कराड तालुक्यातील संजयनगर-शेरे ग्रामपंचायतीची नुकतीच स्थापन झाली. स्थापनेनंतरची पहिलीच निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये ग्रामस्थांना यश आले आहे. कृष्णेचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले, कराड पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब निकम यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले.
याकामी शेरेचे माजी सरपंच मोहन निकम व उद्योजक डी. आर. चव्हाण यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली. निकम व चव्हाण यांनी राजकीय कसब पणाला लावून बिनविरोध निवड प्रक्रिया पूर्ण केली. व सोमवारी अर्ज माघारीनंतर बिनविरोधचे चित्र स्पष्ट झाले. ग्रामपंचायत स्थापनेलाच निवडणूक बिनविरोध झाल्याने इतिहास घडला आहे.
श्री क्षेत्र चौरंगीनाथ डोंगर पायथ्याशी संजयनगर वसाहत आहे. महसुली गावाचा दर्जा असूनही स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्याने विकासाची प्रक्रिया राबवताना अडथळे यायचे. भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल, याची चाहूल लागताच ग्रामस्थांनी गत दोन वर्षांपासून स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी प्रयत्न सुरु केले. शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. सध्या प्रशासकांच्या अधिपत्याखाली कामकाज सुरू होते.
कोरोनामध्ये स्थगित झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होताच संजयनगरमध्ये प्रथमतः निवडणुकीचे पडघम वाजले. पण ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोहन निकम व डी. आर. चव्हाण यांनी पुढाकार घेतला.
























































