फेसबुकवर मैत्री केली…तू नाही भेटलीस तर ब्लेडने गळा कापून आत्महत्या करेन असे धमकावून लग्न केले आणि त्यानंतर दागिने -रोख घेऊन नवरा पळून गेला. हा काही एखाद्या सिनेमातला सीन नाही. तर कोलकात्यातील एका महिलेसोबत ही फसवणूक झाली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेक आर्या असे महिलेची फसवणूक करणाऱ्या इसमाचे नाव असून तो फतेहपूरचा रहिवासी आहे. अभिषेकने फेसबुकवर तिच्याशी मैत्री केली. नंतर ओळख वाढल्यावर तो नात्यातलाच असल्याचे कळले. त्यानंतर अभिषेकने तिला लग्नाची मागणी घातली. तिने नकार देताच ब्लेडने गळा कापून आत्महत्या करण्याची धमकी तिला दिली. पण त्यावरही तिचे उत्तर न आल्याने त्याने थेट विमानाने कोलकाता गाठले. तिथे तिची मनधरणी केली.
ती लग्नाला तयार झाली. त्यानंतर दोघांनी कोर्ट मॅरिज केले आणि दोघं हॉटेलमध्ये राहिले. तिथे त्याने महिलेच्या 3 लाखांच्या दागिन्यांसह 1 लाखाची रोख रक्कम ताब्यात घेतली आणि तो फरार झाला. खूप शोधूनही जेव्हा तो सापडलाच नाही, तेव्हा फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.
महिलेने या प्रकरणी कोलकाता पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने ती पती अभिषेकच्या घरी पोहोचली. घराला टाळं बघून तिने बराच गोंधळ घातला. अभिषेकचे वडील राजू आर्या बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरी करतात. तेही गायब होते. पिडितेच्या आईची मागणी आहे की त्याला शिक्षा मिळायला हवी. आणखी कोणाचे आयुष्य अशाप्रकारे उद्ध्वस्त होऊ नये.
याबाबत एसपी सतपाल अंतिल यांनी कोतवाली पोलिस आणि डीएसपी यांना त्यांच्या मदतीसाठी पाठवले आहे. लवकरच आरोपीला पकडून कोलकाता पोलिसांकडे सोपवण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.



























































