लेख – विवेकानंदांच्या मनातील खरा धर्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वप्ना अनिल वानखडे

नीतिपरायणता व साहस यांच्याव्यतिरिक्त दुसरा धर्म नाही. धर्माला त्याच्या योग्य सीमेतच ठेवून समाजाला स्वतःची उन्नती व विकास करून घेण्यासाठी स्वतंत्रता दिली पाहिजे असे स्वामीजींचे ठाम मत होते. धर्माचा अतिरेक वा उन्माद यांचा स्वामीजी नेहमी विरोध करीत असत. त्याबद्दल स्वामीजी लिहितात की, धर्म हा पंथ उभारण्यात किंवा केवळ धामधूम माजवण्यात नाही. पवित्र व निःस्वार्थ बनण्याचा प्रयत्न करा. यातच खरा धर्म साठलेला आहे. धर्माचे रहस्य प्रत्यक्ष आचरणात आहे, शुष्क मतवादात नाही. स्वतः चांगले व्हा व दुसऱयाचे चांगले करा हाच खरा धर्म स्वामीजींनी जगाला शिकविला.

आताच्या हिंदुस्थानी जनमानसात विवेकानंदांची प्रतिमा ही भगवे वस्त्र धारण करणाऱया एका कट्टर हिंदुत्ववाद्याची आहे. ते फक्त हिंदू धर्माचाच प्रचार व प्रसार करायचे हा निव्वळ गैरसमज आहे. खरे तर स्वामीजींना धर्माची वेगळीच परिभाषा अभिप्रेत होती. स्वामीजींवर हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीयांचा प्रभाव होता. विवेकानंद इंग्रजी, संस्कृत काव्यवाचन करीत. नेपोलियन व फ्रेंच राज्यक्रांतीमुळे ते विलक्षण प्रभावित होते. ते वेदांचे व ‘इमिटेशन ऑफ ख्राईस्ट’ या ग्रंथाचे वाचन नेहमी करीत असत. जॉन स्टुअर्ट मिलच्या धर्मविषयक विचारांचा प्रभाव त्यांच्यावर प्रकर्षाने जाणवतो.

धर्मप्रचारापेक्षा समाजसेवेला स्वामीजींनी जास्त प्राधान्य दिले. त्यांचे गुरू रामचंद्र परमहंसांच्या निधनानंतर शिष्यामध्ये अग्रणी असलेल्या विवेकानंदांनी आपल्या गुरुबंधूंना देशभर फिरून परमहंसांच्या विचारांचा प्रसार करण्याचा उपदेश दिला. ते स्वतः तीन वर्षे हिंदुस्थानभ्रमण करीत राहिले. देशात फिरत असताना गरीब, दुःखी लोकांना बघून त्यांचे अश्रू अनावर होत. ते म्हणायचे, जर जगात खरेच ईश्वर आहे तर त्याचे भक्त भुकेले का राहिले असते? सर्वधर्म परिषदेत भाग घेण्यासाठी जेव्हा त्यांना अमेरिकेला जायचे होते, तेव्हा त्यांच्या अनुयायांनी पाचशे रुपयांची जमवाजमव केली. स्वामीजींना ही गोष्ट फार रुचली नाही. ते म्हणाले, हा पैसा माझ्यासाठी खर्च करण्यापेक्षा गरीब जनतेत वाटून टाकावा. सर्वधर्म परिषदेत जाण्याकरिता निधी भिक्षा मागून जमविण्याची सूचना त्यांनी केली.

मठ-मंदिरे बांधण्यापेक्षा गरजूंना मदत करण्याचा, त्यांचा उद्धार करण्याचा संदेश स्वामीजींनी दिला. धर्म म्हणजे मनुष्याचे जे ब्रह्मरूप आहे, त्याचे प्रकटीकरण होय, असे स्वामीजी सांगत. स्वामीजींप्रमाणे धर्माचा संबंध केवळ आत्म्याशी असून त्याने सामाजिक बाबतीत हात घालू नये. कोणत्याही देशात जे दोष असतात ते त्या ठिकाणी विद्यमान असणाऱया धर्मामुळे नसतात, तर धर्माचे योग्य रीतीने पालन न केल्यामुळेच हे सारे दोष उद्भवलेले असतात, म्हणून धर्माचा काहीही दोष नसून दोष माणसांचाच असतो.

धर्माला सामाजिक कायदे बनविण्याचा व जीवाजीवांमधील विषमतेवर भर देण्याचादेखील काहीही अधिकार नाही. कारण काल्पनिक व भयंकर अशा विषमतेचा पूर्ण नाश करणे हेच धर्माचे अंतिम लक्ष्य होय. धार्मिक मनुष्याबद्दल स्वामीजी म्हणतात, खरा धार्मिक मनुष्य सर्वत्र उदार मताचाच सापडेल. जे धर्माचे दुकान लावतात, ते धर्मात स्पर्धा, झगडे, स्वार्थपरायणता वगैरे सांसारिक गोष्टी आणतात आणि त्यामुळे त्यांना संकुचित आणि उपद्रवी बनणे भाग पडते. स्वामीजी एका पत्रात लिहितात, ‘तत्त्वज्ञान, योग, तपश्चर्या, देवघर, अक्षता, नैवेद्य या सर्व गोष्टी म्हणजे एका व्यक्तीचा किंवा एका देवाचा धर्म होय, परंतु परोपकार हाच सर्वश्रेष्ठ वैश्विक धर्म होय. धर्मग्रंथ, धर्मोपदेशक, आचार्य व उद्धारकर्ते यांच्यावर जो अवलंबून नाही आणि ज्याच्यामुळे या किंवा इतर कोणत्याही जन्मात इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही, तो खरा धर्म होय.’

नीतिपरायणता व साहस यांच्याव्यतिरिक्त दुसरा धर्म नाही. धर्माला त्याच्या योग्य सीमेतच ठेवून समाजाला स्वतःची उन्नती व विकास करून घेण्यासाठी स्वतंत्रता दिली पाहिजे असे स्वामीजींचे ठाम मत होते. धर्माचा अतिरेक वा उन्माद यांचा स्वामीजी नेहमी विरोध करीत असत. त्याबद्दल स्वामीजी लिहितात की, धर्म हा पंथ उभारण्यात किंवा केवळ धामधूम माजवण्यात नाही. पवित्र व निःस्वार्थ बनण्याचा प्रयत्न करा. यातच खरा धर्म साठलेला आहे. धर्माचे रहस्य प्रत्यक्ष आचारणात आहे, शुष्क मतवादात नाही. स्वतः चांगले व्हा व दुसऱयाचे चांगले करा हाच खरा धर्म स्वामीजींनी जगाला शिकविला. सामाजिक कार्य व समाजप्रबोधनाकरिता धर्माचा आधार स्वामीजींनी घेतला. सामाजिक कुरीतींबद्दल सरळ सरळ शब्दांत टीका केल्यास समाजात सुधारणा होण्याऐवजी जनमत सुधारकांविरोधात जाण्याचा संभव असतो. म्हणून गोड बोलून, कडू औषधी पाजून रोग दुरुस्त केल्याप्रमाणे धर्माचा आधार घेऊन आपली सुधारणावादी मतं जनतेला पटवून द्यावीत असे स्वामीजी सुचवितात, पण धर्माच्या नावावर भोंदूगिरी स्वामीजींना मुळीच रुचत नाही. अगदी ‘अयोग्य’ म्हणून समजल्या जाणाऱयातूनच ‘योग्य’ लोक निर्माण करायचे हेच धर्मकार्य स्वामीजी मानत. उपहास, विरोध व अखेर स्वीकार या तीन अवस्थांतूच प्रत्येकच कार्याला आपली वाट काढावी लागते. धर्माला कर्म, संयम, निष्ठा या गुणांची जोड असावी हे सदैव स्वामीजी उद्घोषित करीत असत. स्वामीजी एका पत्रात लिहितात की, प्रत्यक्ष धर्माचा अनुभव आलेला मनुष्य कोणाशीच शत्रुत्व करीत नाही. वर्तमान युगाचा धर्म आहे योग, शक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय. सगळी जुनी निर्जीव अनुष्ठाने म्हणजे केवळ जुन्या भोळसट समजुती आहेत.

स्वामी विवेकानंद हे कधीच कोणत्याच धार्मिक अडथळ्यांना जुमानत नसत. म्हणून स्वामीजी म्हणतात, ‘एका विशिष्ट धर्मात जन्मणे ठीक, पण त्याच्या बंधनात मरणे भयंकर होय.’ सारांश रूपाने विवेकानंदांच्या मनातील विचार केल्यास हे लक्षात येते की, स्वामीजी शुद्ध मानवतावादी, धर्मनिरपेक्षतावादी, विवेकी, बुद्धिवादी, समन्वयवादी, प्रगतीवादी, कर्मकांडविरोधी निर्गुण ईश्वरभक्त होते. ते कुठल्याही एका धर्माला वाहून घेणारे वैयक्तिक समाधीवादी नव्हते. संपूर्ण मानवजातीचा उद्धार करणारे त्यांचे विचार होते. सर्वसमावेशक विवेकानंद समस्त हिंदुस्थानचे होते.