राजाराम तलावावर पक्ष्यांच्या 67 प्रजातींची नोंद, संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या ‘रिव्हर टर्न’चेही अस्तित्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बर्डस ऑफ कोल्हापूर’च्या वतीने पक्षीप्रेमींकडून सध्या पक्षी गणना सुरू असून, रविवारी राजाराम तलावावर तब्बल 67 प्रजातींच्या 836 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचर’ने संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेले रिव्हर टर्न (नदी सुरय) हे पक्ष्यांचेही अस्तित्व यामध्ये नोंदवले गेले आहे. कळंबा तलावासह राजाराम तलावावरही स्थलांतरित बदकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आल्याचे पक्षीनिरीक्षक प्रणव देसाई यांनी सांगितले.

कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भाग निसर्ग संपत्तीने समृद्ध आहे. नदी, तलाव अशा पाणवठय़ावर विविध पक्ष्यांच्या प्रजाती पाहावयास मिळतात. अगदी सातासमुद्रापार दरवर्षी स्थलांतर करणारे पक्षीही येथे ठिकठिकाणी दिसून येतात. पक्षीप्रेमींना तर या पक्ष्यांचे निरीक्षण आणि गणना करण्याची मोठी संधी मिळते. यातून पक्ष्यांच्या विविध प्रजातींसह वाढती आणि घटती संख्या, वातावरणातील बदल याचाही यातून अभ्यास केला जातो. काही दिवसांपूर्वी कळंबा तलाव परिसरात पक्षी गणना करण्यात आली. पाठोपाठ रविवारी निसर्गरम्य अशा राजाराम तलाव परिसरातही सकाळी पक्षी गणना पार पडली.

गेल्या वर्षी राजाराम तलावावर पक्षी गणनेत 63 प्रजातींचे 454 पक्षी नोंदवले गेले होते. यावेळी 67 प्रजातींचे 836 पक्षी नोंदविण्यात आले. तसेच ‘आययूसीएन’ने संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेले रिव्हर टर्न (नदी सुरय) हे पक्षीसुद्धा यामध्ये नोंदवले गेले. यात 14 स्थलांतरित पक्ष्यांत कॉमन सॅन्डपायपर (सामान्य तुतारी), ग्रीन सॅन्डपायपर (हिरवा तुतारी), कॉमन ग्रीनशांक (सामान्य हिरवा टिलवा ), क्लॅमरस रीड वोब्लर (दंगेखोर बोरू वटवटय़ा), ब्लिथस रीड वोब्लर (ब्लिथचा बोरू वटवटय़ा), पॅडीफील्ड वोब्लर (धान वाटवटय़ा), बुटेड वोब्लर (पायमोज वटवटय़ा), रोजी स्टारलिंग (गुलाबी मैना), टायगा फ्लायकेचर (लाल कंठाची माशीमार), ब्राऊन श्राइक (तपकिरी खाटिक), ब्लिथस पीपीट (ब्लिथची तिरचिमणी), येल्लोव वॅगटेल (पिवळा धोबी), व्हाईट वॅगटेल (पांढरा धोबी) नोंदवले गेले.

ज्येष्ठ पक्षीमित्र दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणव देसाई, सत्पाल गंगलमाले, अभिषेक शिर्के, ऋतुजा पाटील, स्वप्नील असोडे आदींनी या मोहिमेचे आयोजन केले होते. 17 जानेवारी शिवाजी विद्यापीठ आणि 24 जानेवारी रोजी ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसरातही पक्षी गणनेचा अनुक्रमे तिसरा व चौथा टप्पा होणार असल्याचे प्रणव देसाई यांनी सांगितले.