अमेरिकेत हाय अलर्ट, बायडन यांच्या शपथविधीत घातपाताची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत सुरू असलेला सत्तासंघर्ष लक्षात घेता देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमेरिकेतील संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्लाबोल केल्यानंतर येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यावर चिंतेचे ढग पसरले आहे. जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यात घातपाताच्या शक्यतेची भीती अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) वर्तविली आहे. यासंदर्भात एफबीआयने विशेष बुलेटीन जाहीर करीत देशातील 50 राज्यांत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

‘न्यूयार्क टाइम्स’ने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले असून काही दिवसांपूर्वीच एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर वेरी आणि होमलँड सिक्युरिटीचे केनेथ कुसनेली यांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर या दोन्ही अधिकाऱ्य़ांनी तपास यंत्रेणेच्या प्रमुखांची भेट घेतली. या भेटीनंतर एफबीआयने बुलेटीन जाहीर करीत देशात हाय अलर्टचा इशारा दिला आहे.

त्या राज्यात अधिक धोका

एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीचे सरकार आहे आणि ज्या ठिकाणी गव्हर्नर रिपब्लिकन पक्षाचे आहेत त्या ठिकाणी अधिक धोका आहे.

महाभियोगाच्या निर्णयामध्ये ट्रम्प समर्थकांमध्ये असंतोष

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग दाखल करण्यास मंजुरी देण्यात आल्याने ट्रम्प समर्थकांमध्ये मोठय़ा प्रमाणात नाराजी पसरली आहे. त्यामुळे बायडन यांच्या शपथविधीच्य्या दिवशी हिंसाचार घडविला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.