
कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत रविवारी दिवसभरात 715 कोरोनामुक्त झाले तर 530 जणांना कोरोना झाला. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 392 दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईतील विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 242वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 83 हजार 850वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर आले आहे, तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 392 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 772वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 25 लाख 96 हजार 790 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 3 लाख 2 हजार 753वर पोहोचली आहे.
राज्यात दिवसभरात 2,342 जण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर
कोरोनाविरोधात महाराष्ट्रभर राबवण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात रविवारी दिवसभरात 2 हजार 342 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.76 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर 3 हजार 81 कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना पार्श्वभूमीवर राज्यभरात राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकांकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 50 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.53वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 38 लाख 6 हजार 387 चाचण्या झाल्या असून 19 लाख 90 हजार 759 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 25 हजार 308 जण होम कोरंटाईन असून 2 हजार 45 जण संस्थात्मक कोरंटाईन आहेत.































































