TRP घोटाळाप्रकरणी दिलासा देण्यास सत्र न्यायालयाचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्णब गोस्वामी याच्या रिपब्लिक टीव्हीच्या दर्शकांची संख्या वाढवण्यासाठी लाच स्वीकारत टीआरपी घोटाळा करणाऱया बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना मुंबई सत्र न्यायालयाने आज दणका दिला. न्यायाधीश एम. ए. भोसले यांनी आरोपी असलेल्या पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले बीआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दासगुप्ता हे मधुमेहाने पीडित असून त्यांना शनिवारी नवी मुंबई येथील तळोजा केंद्रीय तुरुंगातून जेजे रुग्णालयात नेण्यात आले. 4 जानेवारी रोजी जामीन अर्ज दंडाधिकारी कोर्टाने फेटाळून लावल्याने पार्थो यांनी सुटकेसाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला.

या अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी घेण्यात आली त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने पार्थोच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध करण्यात आला. सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना कोर्टाला सांगण्यात आले की पार्थो आणि अर्णब गोस्वामी या दोघांचे व्हाट्सअॅप चॅट मधून बरीच गोपनीय माहिती बाहेर आली आहे.

आरोपीला जामीन दिल्यास पुराव्यांशी छेडछाड करेल त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्यात यावा. सत्र न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत पार्थो दासगुप्ता यांना दिलासा देण्यास नकार दिला व त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.