आधी तू लस घे, मग मी घेतो! आरोग्य कर्मचाऱयांची मानसिकता दूर करण्यासाठी समुपदेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आधी तू लस घे मग मी घेतो’ अशी मानसिकता आरोग्य कर्मचाऱयांमध्ये दिसत आहे. ही मानसिकता दूर करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यासाठी छोटे व्हिडीओ रेकॉर्ड करून ते सगळ्या आरोग्य कर्मचाऱयांना पाठवले जात आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

काही आरोग्य कर्मचाऱयांकडून लस घेण्यास विलंब केला जात आहे. त्यांच्या मनात असलेल्या शंकांमुळे ते असे करीत असल्याने याबाबत आरोग्य विभागाने त्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. करोनावरील दोन्ही व्हॅक्सीन सुरक्षित आहेत.

वैज्ञानिकांनीच तशी खात्री दिली आहे. त्यामुळे कोविड लसीकरण कार्यक्रमात आरोग्य कर्मचाऱयांनी कोणतीही भीती न बाळगता सहभागी व्हावे, असे आवाहनही टोपे यांनी यावेळी केले. राज्यात पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 54 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

अॅप संथगतीने चालत असल्याने काहीशी आडकाठी येत आहे. लाभार्थींची दुबार नावेही जात आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे लोकांच्या मनात थोडासा गोंधळ होणे स्वाभाविक आहे. म्हणून ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्याचे काम केंद्रस्तरावर सुरू आहे.

केंद्राच्या या गोष्टी वारंवार निदर्शनास आणून दिल्या आहेत आणि निश्चितच या त्रुटी दूर होतील, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.

…तर लस घेणारा मी पहिला मंत्री असेन

केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे जर ठरवलं की मंत्र्यांनी पहिल्यांदा लस घ्यावी तर मी पहिला मंत्री असेन जो लस घेईल. मात्र आमचा टर्न हा शेवटी आहे. अगोदर कोरोनामध्ये ज्यांनी काम केलं त्यांना सर्वात आधी सुरक्षित करायला हवं असं केंद्राचं मत आहे.

त्यानंतर प्रैंट लायनर म्हणजे पोलीस, सुरक्षा कर्मचारी, त्यापाठोपाठ समाजात ज्यांना कोरोनाचा अधिक त्रास होऊ शकतो असे ज्येष्ठ नागरिक, मधुमेही तसेच अन्य आजार असलेले लोक यांना लस देण्यात येईल आणि नंतर इतरांना लस दिली जाईल.