
कोरोना संकट तसेच पालिका रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या 40 ते 50 टक्के रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर, सेवानिवृत्त होणारे डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर आणि डीन, प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात एका वर्षाची वाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या संदर्भातील दोन प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आले.
मुंबईत कोरोना नियत्रणात असला तरी संसर्ग कमी झालेला नाही. त्यामुळे रुग्णालयात डॉक्टरांची तर पालिका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची कमतरता भासत असल्याचे कारण देत पालिका प्रशासनाने वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचे निवृत्तीचे वय 58 वरून 59 एवढे करण्याचा पालिका प्रशासनाने निर्णय घेतला होता. त्या संबंधित कार्योत्तर मंजुरीसाठीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या 8 जानेवारीच्या बैठकित मंजूर न करता राखून ठेवण्यात आला होता. त्याला आज मंजुरी देण्यात आली. तसेच आज रुग्णालय डीन, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 63 करण्याचा निर्णय पालिकेने घेतला.




























































