भंडारा आग दुर्घटना- दोन नर्सच्या हलगर्जीपणामुळे दहा कोवळय़ा जिवांचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडारा जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात बालक केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे राज्य सरकारला आज सादर करण्यात आलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. दोन परिचारिकांच्या बेजबाबदारपणामुळे आग लागल्याचा ठपका या अहवालात ठेवला आहे. या आगीत दहा नवजात कोवळ्या जिवांचा मृत्यू झाला होता.

कोणाचे जबाब नोंदवले…

या चौकशी समितीने आरोग्य विभाग, अग्निशमन दल, विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, व आरोग्य कर्मचाऱयांचे जबाब नोंदवले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी दोन दिवस अभ्यास करून त्यांचे अंतिम मत नोंदवून आज हा अहवाल सादर केला.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये 9 जानेवारीच्या मध्यरात्री आग लागली होती. या आगीत तीन बालकांचा होरपळून तर सात बालकांचा धुरात गुदमरून मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली होती. या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने पन्नास पानांचा अहवाल राज्याच्या आरोग्य विभागाला सादर केला आहे.

अहवालात काय?

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे या अहवालात नमूद केले आहे. शॉर्ट सर्किटमुळे एसएनसीयूमधील बॉडी वॉर्मरला आग लागली. काही वेळाने ही आग आऊटबॉर्न विभागात पसरली.

युनिटमध्ये कोणी नव्हते

या युनिटमध्ये आग लागली त्यावेळी कोणीही उपस्थित नव्हते. जर त्यावेळी युनिटमध्ये परिचारिका थांबल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती असे निरीक्षण समितीने नोंदवले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांवरही ठपका

चौकशी समितीने जिल्हा शल्य चिकित्सक व इतर संबंधितांवरही ठपका ठेवला आहे. यातील कोणावर कारवाई करायची हे सरकारने ठरवायचे असे समितीने अहवालात नमूद केले आहे.

समितीच्या उपाययोजना

चौकशी समितीने उपायोजनाही सुचवल्या आहेत. त्यासाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱयांची पाहणी करावी. रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला दरवर्षी ठरावीक निधी द्यावा आणि हा निधी खर्च होतो अथवा नाही यावरही लक्ष ठेवण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे.

हा चौकशी अहवाल आरोग्य विभागाला सादर झाल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मान्य केले. मात्र उद्या यावर भाष्य करणार आहोत असे टोपे म्हणाले. हा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर झाला नाही असेही ते म्हणाले.