पिकअपच्या चोरकप्प्यातून साडेसहा लाखांच्या दारुची अवैध वाहतूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिकअप जीपमध्ये चोरकप्पा बनवून दारूची अवैध वाहतूक रोखण्यात उत्पादन शुल्कच्या पुणे विभागातील पथकाला यश आले आहे. या कारवाईत सहा लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, जीपचालकाला अटक करण्यात आली आहे.  दरम्यान, संगमनेर येथे येऊन पुणे येथील उत्पादन शुल्क विभाग अवैध दारूची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर कारवाई करीत असताना संगमनेरच्या उत्पादन शुल्क विभागाला याची काहीही माहिती नव्हती. हंसराजभाई मोहनभाई ठाकूर (वय 28, रा. सुरत, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या जीपचालकाचे नाव आहे.

संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिवरगाव- पावसा टोल नाक्यावरून पिकअप जीपमधून अवैधरीत्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पुणे येथील उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी दिगंबर शेवाळे यांना समजली होती. त्यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस नाईक प्रताप कदम, अहमद शेख, अमर कांबळे, शशांक झिंगरे यांच्या पथकाने हिवरगाव-पावसा टोलनाक्यावर सापळा रचला. जीप टोलनाक्यावर येताच पथकाने पाठलाग करून जीपला थांबविले. तपासणी केली असता जीपच्या मागील बाजूला चोरकप्पा बनवून त्यात दारूच्या 1200 बाटल्या लपविल्याचे दिसून आले, तर एका बॉक्समध्ये विदेशी दारूच्या 48 बाटल्या वेगळ्या आढळून आल्या. दारूच्या बाटल्यांचा सहा लाख 66 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला आहे.