
शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाला मुरड घातली असे मला तरी वाटत नाही. किमान समान कार्यक्रम हा प्रबोधनकार ठाकरे यांनी वेगळ्या पद्धतीने मांडला होता. त्याला आता शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगली साथ देत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. शिवसेनेची ही कृती उत्तम असून त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाला चांगलाच धडा शिकवला आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रबोधन’ शतक महोत्सव आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. राज्यात आता शिवसेना सत्तेत आहे. हे 25 वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते. त्यामुळे आता तरी पुढे जाऊया, असे आवाहनही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले.


























































