
अनेकांना झोपेत असताना छातीवर कोणीतरी बसलं असून गळा दाबत असल्याचा किंवा छातीवर भयंकर दाब आल्यासारखं वाटतं. यामुळे झोपेतच ती व्यक्ती हालचाल करण्याचा प्रयत्न करते, मात्र त्या व्यक्तीला हालचालच करता येत नाही. हा सगळा प्रकार भुताटकीचा असल्याचं अंधश्रद्धेतून सांगितलं जातं. मात्र याकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिल्यास हा भुताटकीचा प्रकार नसल्याचे स्पष्ट होते. असा अनुभव आलेल्या एका व्यक्तीने त्याच्यासोबत नेमकं काय घडलं होतं आणि त्यामागची खरी कारणे काय होती हे विस्ताराने सांगितलं आहे.
यांत्रिकी अभियंता असलेल्या सचिन भिसे याने त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. त्याने म्हटलंय की त्याला अशा प्रकारचा अनुभव पूर्वी बऱ्याचदा आलेला आहे. खासकरुन दिवसा किंवा दुपारी झोपेत असताना हा अनुभव त्याला नेहेमी यायचा. सचिन याने म्हटले आहे की ‘गाढ झोपेत असताना कुणीतरी छातीवर बसून दाबून धरले आहे, गळा दाबत आहे असं वाटायचं. यामुळे जीव घाबराघुबरा व्हायचा आणि जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करायचो. मात्र तोंडातून आवाज फुटायचा नाही, ऊठण्याचा प्रयत्न करूनही उठता यायचं नाही. अशा वेळी झोप मोडते आणि जाग येते. जाग आल्यानंतर अंगाला दरदरून घाम फुटलेला असतो.’ सचिन यांनी म्हटलंय की हा प्रकार भुताटकीचा नसून हा स्लीप पॅरालिसिस नावाची अवस्था असते, ज्याचा सामना बहुसंख्य लोकांनी केलेला असतो.
कोरा (Quora) या प्रश्नोत्तराच्या मंचावर सचिन भिसे याने उत्तर प्रसिद्ध केले असून त्यात त्याने म्हटले आहे की शरीर झोपलेले असताना, मेंदू जागृतावस्थेत असतो. ज्यामुळे स्लीप पॅरालिसिसची अवस्था निर्माण होते. शरीर निद्रावस्थेत असल्याने हातपाय किंवा इतर अवयवांवर तुमचा ताबा नसतो, ज्यामुळे तुम्हाला त्यांची हालचाल करता येत नाही. शरीर मेंदूकडून आज्ञा स्वीकारत नसतं ज्यामुळे शरीर एका अर्थाने शक्तीहीन झालेलं असतं. अनेकदा शरीर आणि मेंदू हे दोन्ही एकत्र जागृतावस्थेत येण्यापूर्वी पहिले मेंदू जागृत होतो त्यावेळी स्लीप पॅरालिसिसची स्थिती निर्माण होते.
सचिन यांनी त्यांच्या उत्तरात म्हटलंय की ‘ बहुतांश स्लीप पॅरालिसिसग्रस्त जाग आल्यानंतर दावा करतात की त्यांच्या छातीवर भीतीदायक चेहरा असलेले एखादे भूत बसले होते. या भुताने त्यांना जखडून ठेवलेले असल्याने ते त्यांना जागेवरून उठू देत नव्हते. प्रत्यक्षात त्या व्यक्तीचे छातीवर ठेवलेले हात हेच त्याला जड वाटत असतात ज्यामुळे त्याला छातीवर दाब आल्यासारखं वाटत असतं. ही समस्या वरचेवर होत असल्यास एका कुशीवर किंवा हात सरळ ठेवून पाठीवर झोपून पाहावे असा सल्लाही सचिन भिसे याने दिला आहे. वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे तसेच पूर्ण झोप घेतल्यास असा त्रास होणार नाही असंही त्याने म्हटले आहे.




























































