
>> बकुल बोरकर
सीसीआयआयने आयुर्वेदाचार्यांना वेगवेगळ्या 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा घेतलेला निर्णय अनाकलनीय आहे. बारावीनंतर मेडिकलसाठी पसंतीक्रम सर्वसाधारणपणे प्रथम एमबीबीएस, मग डेंटल, त्यानंतर फिजिओथेरपी, होमिओपॅथी, आयुर्वेद असा असतो. एमबीबीएसनंतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणाऱया निवडक डॉक्टर्सना सर्जरीचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळतो. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एमएस (सर्जन) ही पदवी मिळते. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये वरिष्ट सर्जनच्या हाताखाली शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण काही वर्षे घ्यावे लागते. मगच त्यांना प्रॅक्टिस सुरू करण्याचे लायसेन्स मिळते. यावरून अॅलोपॅथिक सर्जन होण्यासाठी व आयुर्वेदाचार्य सर्जन होण्यासाठी लागणारी बौद्धिक कुवत आपण समजू शकतो. एमबीबीएससाठी शिकवले जाणारे विषय आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात शिकवले जात नसल्यामुळे आयुर्वेदाचार्याना एमएस (सर्जन) ही पदवी देऊन या डॉक्टरांच्या पंगतीत बसवणे हास्यास्पद आहे.
सर्वसाधारणपणे एखादा आजार औषधांनी बरा होण्यासारखा नसल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रिया म्हणजे शरीरातील रोगग्रस्त अवयवाची चिरफाड करून आजाराचे मूळ काढून टाकणे व टाके घालून शिवून तो अवयव व शरीर पूर्ववत करून रुग्णास बरे करणे. यासाठी गरजेनुसार त्या अवयवापुरती (लोकल) किंवा पूर्ण शरीराला भूल द्यावी लागते. म्हणजे शस्त्रक्रिया करत असताना होणाऱया वेदना रुग्णास जाणवत नाहीत. साधी अॅबसिस काढून टाकण्याची शस्त्रक्रिया असली तरी त्यापूर्वी रक्त तपासणी व मधुमेह नसल्याचा दाखला, दुखऱया अवयवाचे एक्स-रे, रक्तदाबाचा त्रास असल्यास तो नियंत्रणात असून शस्त्रक्रिया करून घेण्यास रुग्ण फिट आहे असा एमडी डॉ.चा दाखला असे अनेक दाखले घेऊन सर्जनला दाखवावे लागतात. शस्त्रकियेनंतर जखमेचे ड्रेसिंग, टाके काढणे आदी सोपस्कार असतात. या साखळीतील पॅथॉलिस्ट, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, अॅनेस्थेसिस हे अॅलोपॅथिक शाखेचे असतात व त्यांना एकमेकाची ‘भाषा’ समजते. औषधे अॅलोपॅथिक असतात. या साखळीत आयुर्वेदाचार्य कुठे व कसे बसतील हा प्रश्नच आहे. एमएस या पदवी साधर्म्यामुळे अॅलोपॅथिक सर्जन कोण व आयुर्वेदिक सर्जन कोण हे समजणार नाही व रुग्णांची फसगत होईल. हा निर्णय म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळ आहे.




























































