
ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्याने मृत झालेल्या तरुणाची ओळख पटवण्यात चर्चगेट रेल्वे पोलिसांना यश आले. अजय नायक असे त्याचे नाव आहे. उपचारा दरम्यान त्याने पोलिसांना अशोक कॉलनी आणि जोधपूर एवढेच सांगितले होते, त्यावरून चर्चगेट रेल्वे पोलिसांनी तपास करून अजयच्या नातेवाईकांना शोधून काढले.
अजय हा मूळचा राजस्थानचा रहिवासी होता. गेल्या महिन्यात तो मुंबईत आला होता. ग्रँटरोड स्थानकात त्याला ओव्हरहेड वायरचा शॉक लागला. शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. पोलीस शिपाई जाधव यांनी त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल केले. वरिष्ठ निरीक्षक प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनखाली उप निरीक्षक उज्ज्वल आरके, वाघमारे, गोडगे, पवार, मोरे, कोटेवार, गायकवाड, जाधव, यांनी तपास सुरू केला. अजय हा भाजला गेल्याने तो जास्त काही सांगत नव्हता. त्याने त्याचे नाव आणि अजित कॉलनी, जोधपूर एवढेच सांगितले. उप निरीक्षक आरके यांनी जोधपूर येथील एकाची मदत घेतली. त्यानंतर अजय राहत असलेल्या रातनाडा पोलीस ठाण्याशी संपर्क केला. पोलिसांनी अजयच्या मामाला शोधून काढले. मामाने अजयच्या मृत्यूची माहिती त्याच्या वडिलांना दिली.
अंत्यविधीसाठी केली मदत
अजयची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याचे कुटुंबीय मुंबईत येऊ शकत नव्हते. पोलिसांनी एक बुंद जिंदगी नावाच्या एनजीओशी संपर्क साधला. एनजीओच्या पदाधिकाऱ्यांनी अजयच्या कुटुंबीयांची समजूत काढली. अजयचे कुटुंबीय चर्चगेट रेल्वे पोलीस ठाण्यात आल्यावर त्यांना अजयचा मृतदेह दाखवून अंत्यविधी केले. नातेवाईकांना घरी जाण्यासाठी रेल्वेची तिकीट काढून दिली.


























































