कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या कोल्हापूर महापालिकेची प्रभागरचनेची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

एप्रिल-मे 2021मध्ये होणाऱ्या कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे 15 जानेवारी 2021 ही अंतिम तारीख जाहीर केली आहे. त्या दिवशी (म्हणजेच 15 जानेवारी 2021 रोजी) अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदारयादीच सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरण्यात येईल, असा आदेशही देण्यात आलेला आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांची धावपळ वाढली आहे.

असा असेल मतदार यादीचा कार्यक्रम

16 फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, 16 ते 23 फेब्रुवारीपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. 3 मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, 8 मार्च रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 12 मार्च रोजी अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यानंतरच निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

नगर मनपा पोटनिवडणुकीची प्रक्रियाही सुरू

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय संभाजीनगर खंडपीठाने वैध ठरविला होता. त्यामुळे मनपाच्या प्रभाग  क्रमांक 9 ‘क’मध्ये पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम आज जाहीर केला आहे.