
शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱया मनसे पदाधिकाऱयांना शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मनसे तर टाइमपास टोळी, त्यांना गांभीर्याने का घ्यायचं? असा टोला आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
मुंबईत फेरीवाल्यांकडून शिवसेनेच्या नावाने खंडणी गोळा केली जात असल्याचा आरोप मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केला होता. याबाबत पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारलं असता, त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत, पण बोचरी प्रतिक्रिया दिली.
मनसे हा नेमका पक्ष आहे की संघटना आहे हेच मला कळत नाही. ही ‘टाइमपास टोळी’ आहे असंच म्हणावं लागेल. यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्ते देखील लक्ष देत नाहीत. त्यामुळं याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.


























































