शेतकरी आंदोलनाला हिंदुस्थानातील सेलिब्रिटी पाठिंबा का देत नाही ? प्रसिद्ध यूट्यूब अभिनेत्रीने सांगितले कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत अमेरिकेतील गायिका रिहाना हिने ट्विट केलं.  तिच्यापाठोपाठ पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग, यूट्यूबर लिली सिंह, हॉलीवूड अभिनेता जॉन क्युसेक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.   त्यानंतर देशातील काही मोजक्या सेलिब्रिटींनीही ट्विट करत आपली मते व्यक्त केली. यातील काही सेलिब्रिटींनी हा आमचा देशांतर्गत प्रश्न असून देशाबाहेरील लोकांनी याबाबत बोलू नये असे मत व्यक्त केले होते.  यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

हिंदुस्थानात काही सेलिब्रिटी असे आहेत जी त्यांची मते बिनधास्तपणे मांडत असतात, मात्र यातील अनेकांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया देण्याचं टाळल्याचं पाहायला मिळतंय.  हे सेलिब्रिटी आता मूग गिळून गप्प का बसले आहेत? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. ज्या सेलिब्रिटींनी त्यांची मते व्यक्त केली आहेत त्यांना  ‘विदेशातील कलाकारांनी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर तुम्हाला जाग का आली?’ असा प्रश्न  विचारला जात आहे.  सेलिब्रिटी या विषयावर बोलत का नाहीत ? याचं उत्तर यूट्यूबमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्रीने दिलं आहे.

अमांडा कर्नी असं या यूट्यूबर अभिनेत्रीचं नाव आहे.  कर्नीच्या एका फोटोवर तिच्या चाहत्याने प्रतिक्रिया लिहिली होती की हिंदुस्थानातील अनेक सेलिब्रिटी या आंदोलनावर त्यांची प्रतिक्रिया देणं टाळतायत. अमांडाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मी खूप लोकांशी बोलले आहे आणि मला हे माहिती आहे.  अमांडाने पुढे लिहिलं आहे की ही मंडळी रोजीरोटीवर परीणाम होईल या भीतीने बोलत नाहीयेत.  अमांडाने म्हटलंय की आता बऱ्याच गोष्टी राजकीय झाल्या आहेत. ज्यामुळे कलाकारांच्या मनात कारकीर्द उध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

अमांडाने तिच्या चाहत्याला दिलेल्या उत्तरात म्हटलंय ‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो तुम्ही त्यांच्यासाठी आवाज जेव्हा बनता तेव्हा तुम्ही एकाप्रकारचे बलिदान देत असता. सुरुवातीला तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो मात्र शेवटी तुम्हाला समाधान मिळतं की जीवनातील खऱ्या उद्देश प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनातील आवाज ऐकलात.  यामुळे तुम्ही तुमचे जीवन सन्मानाने जगू शकता. ‘  ही प्रतिक्रिया देणाऱ्या अमांडाचे इन्स्टाग्रामवर 2.5 कोटी फॉलोअर्स आहेत.  अमांडाने स्वत: शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि तिच्यावरही यावरून टीका करण्यात आली होती.