झाडांना जीवदान देणारी रुग्णवाहिका! पर्यावरणप्रेमी आयआरएस अधिकाऱयाचे कौतुकास्पद पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणारी आणि त्यांचे प्राण वाचवणारी रुग्णवाहिका सर्वांनाच माहीत आहे. परंतु पंजाबमधील रोहित मेहरा या आरआरएस अधिकाऱयाने चक्क झाडांना जीवदान देणारी रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेचे पर्यावरणप्रेमी काैतुक करत आहेत.

रस्त्याच्या कडेला अनेक झाडे वाळतायत, काही उन्मळून पडण्याच्या स्थितीत आहेत. अशा झाडांना जीवदान देण्यासाठी रोहित मेहरा यांनी पत्नीच्या नावे ‘पुष्पा ट्री अॅण्ड प्लान्ट हॉस्पिटल अॅण्ड डिस्पेन्सरी’ नावाने सेवा सुरू केली आहे. त्यांनी हेल्पलाईन क्रमांक दिला असून त्यावर नागरिकांनी झाडांचे फोटो पाठवल्यास रुग्णवाहिका तेथे दाखल होते. नागरिकांकडून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आजवर अनेक झाडांना त्यांनी जीवदान दिले आहे. अगदी सात ते आठ फूट उंचीच्या झाडांचेदेखील त्यांच्या टीमने पुनर्रेपण केले आहे. झाडांना कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही याची खासकरून काळजी घेतली जाते.

अशी आहे रुग्णवाहिका

झाडांसाठी सुरू केलेल्या खास रुग्णवाहिका ही ई-रिक्षापासून तयार केली आहे. रुग्णवाहिकेत कात्री, कटर, खड्डा खोदण्यासाठी मशीन, पाण्याची टाकी, झाडांना औषध घालण्यासाठी मशीन, खत, फावडा आदी साहित्य असते. मेहरा यांच्याकडे 12 जणांची टिम कार्यरत असून त्यापैकी 7 जणांनी वनस्पती विज्ञानाचे धडे घेतले आहेत.