>> प्रा. मिलिंद जोशी
डॉ. दिलीप देशपांडे हे मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. औद्योगिक सुरक्षितता तज्ञ म्हणूनही त्यांनी व्यवसाय केला. या क्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांनी त्यांची साहित्याशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही. त्यांनी कविता लेखन केले, कथेची वाट चोखाळून पाहिली. त्यांच्या ‘अभियंता वृत्तीला’ साजेसा प्रयोग त्यांनी ‘त्रिरंग’ या पुस्तकात केला आहे. मराठी साहित्यात वेगवेगळे वाङ्मय प्रकार स्वतंत्रपणे हाताळणारे अनेक प्रतिभावंत आहेत, पण दोन-तीन वाङ्मय प्रकारांना एकत्र आणून कलाकृती निर्माण करणारे लेखक अपवादभूत आहेत. डॉ. दिलीप देशपांडे त्यांच्यापैकी एक आहेत.
मातृत्वाचा गौरव करणाऱया या देशात स्त्री त्वाची मात्र अप्रतिष्ठा केली जात होती. स्त्री प्रथम सुविद्य झाली पाहिजे, त्यानंतरच तिच्या आत्मप्रकटीकरणाचे युग येईल असे समाजातील जाणत्या लोकांना वाटले. त्यांनी प्रयत्न केले. स्त्री जीवनात शिक्षणाची पहाट फटफटली. स्त्रीयांना आत्मभान आले. आज भूगर्भापासून-अंतरिक्षापर्यंत कर्तृत्वाच्या सर्व क्षेत्रांत स्त्र्ाया अग्रेसर आहेत. हे परिवर्तन दुधाचे दही व्हावे इतक्या सहजतेने घडले नाही. स्त्रियांकडे पाहण्याची समाजाची मानसिकता हाच स्त्रियांच्या विकासातील मोठा अडसर होता. स्त्रियांकडे उपभोगाची वस्तू म्हणूनच पाहिले जात होते. त्यामुळे स्त्रियांवर अत्याचार होत होते. त्याविषयी बोलण्याचे धाडस स्त्रियांकडे नव्हते. ज्यांच्याविषयी बोलायचे त्यांच्याच हातात सगळी सत्ताकेंद्रे होती. त्यांची दहशत इतकी होती की, अन्याय-अत्याचार होऊनही स्त्रिया बोलत नव्हत्या. त्यामुळे या लोकांचे चांगलेच फावत होते. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. स्त्रिया शिकल्या. जाणत्या झाल्या. समाजमानसही काही प्रमाणात बदलले. माध्यमांनी दखल घ्यावी यासाठी समाज माध्यमांवर आग्रहपूर्वक व्यक्त होणे घडू लागले. त्यामुळे अन्यायाला वाचा फुटू लागली. स्त्रियांमध्येही धैर्य आले. अत्याचाराविरुद्ध त्या आवाज उठवू लागल्या. हे जे परिवर्तन घडले, त्यावर ‘पूर्वरंग’ अणि ‘उत्तररंग’ अशा दोन भागांत देशपांडे यांनी नेमका प्रकाश टाकला आहे. कालौघात घडलेले हे स्थित्यंतर ‘त्रिरंग’च्या केंद्रस्थानी आहे. काळाचा एक तुकडा त्यांनी या पुस्तकात उलगडून दाखविला आहे.
साहित्याचे वेगवेगळे रंग एकमेकांत मिसळणे खरोखरीच कठीण असते. कारण त्यातल्या प्रत्येक रंगाची एक वेगळी छटा असते. ती काही केल्या पुसता येत नाही आणि इतर रंगांत सहजपणे मिसळतही नाही. अभियंत्याला काहीही अशक्य नसते असे म्हणतात. साहित्याचे विविध रंग एकमेकांत मिसळून नवा साहित्यरंग निर्माण करण्याचा डॉ. देशपांडे यांचा प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल.
केशवसुत म्हणत, ‘‘कविता म्हणजे आकाशीची वीज आहे. ती पकडू पाहणारे शेकडा नव्याण्णव जळून खाक होतात.’’ प्रतिभेच्या चिमटीत कवितेला पकडणे खरोखरीच कठीण असते. कादंबरी लेखन ही तर जोखीमच असते. जीवनाची व्यामिश्रता लक्षात घेता हाती आलेल्या अनुभवाच्या छोटय़ाशा तुकडय़ाचे अनेक कंगोऱयांतून दर्शन घडविण्याचे आव्हान कादंबरीकारासमोर असते. प्रतिभा, शब्दसामर्थ्य आणि शैली आहे म्हणून कादंबरी लिहिता येतेच असे नाही. त्यासाठी लेखकाचे अनुभव विश्वही तेवढेच समृद्ध असावे लागते. कादंबरी म्हणजे गोष्ट नसते, तो अनुभवाचा वृत्तांतही नसतो. प्रत्येक लेखकाची ती एक जीवनदृष्टी असते. त्याआधारे तो जीवनाचा अन्वयार्थ लावत असतो. त्यासाठी लेखकाचे जीवनविषयक चिंतनही तितकेच खोल असावे लागते. ही सारी साहित्य साधना कसदार साहित्य निर्मितीसाठी गरजेची असते. डॉ. देशपांडे यांनी त्यांच्यापरीने ती केली आहे. हे पुस्तक वाचताना जाणवते.
‘वाचनीयता’ हा साहित्याचा महत्त्वाचा गुण आहे. हे पुस्तक वाचकांची उत्सुकता वाढविणारे आहे. मळलेल्या वाटांनी न जाता लेखनातल्या नवनव्या वाटा शोधण्याचा डॉ. देशपांडे यांचा प्रयत्न वाचकांनाही आवडेल अशी आशा ठेवायला हरकत नाही.





























































