भाजीमंडई स्थलांतरावरून व्यापारी-प्रशासनातील वाद शिगेला, व्यापाऱयांनी ईश्वरपूर पालिकेतच भरविली भाजीमंडई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईश्वरपुरातील जुन्या गणेश भाजीमंडईतील व्यापाऱयांना नव्या छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडईत हलविण्यावरून प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील वाद आज शिगेला पोहोचला आहे. आज शनिवारी जुन्या मंडईत बसण्यास विक्रेत्यांना पोलिसांनी अटकाव केल्याने तणाव वाढला. पोलिसांनी अनधिकृतपणे प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारल्याने विक्रेत्यांनी थेट नगरपालिका गाठली आणि पालिका इमारतीच्या आवारातच भाजीमंडई भरवली.

ईश्वरपूर शहराच्या पश्चिमेला गणेश मंदिराच्या परिसरात जुनी भाजीमंडई आहे. यापूर्वी 2006 साली ही मंडई स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केला होता; पण तेव्हा तिथे सुविधा नव्हत्या. सुविधा द्या मग जातो, अशी त्यावेळी व्यापाऱयांची भूमिका होती. आता सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मंडई नव्या जागेतच भरेल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. या प्रश्नावर दोन-तीन दिवसांपूर्वी हेच विक्रेते पालिकेच्या आवारात आले होते. तासभर ठाण मांडून होते. शुक्रवारी पुन्हा त्यांची निराशा झाली. उद्या काय ते बघू म्हणत विक्रेते निघून गेले होते. आज सकाळी पुन्हा वाद पेटला अन् विक्रेत्यांनी थेट नगरपालिका आवार गाठून मंडई भरवली. दरम्यान, भाजीमंडई नवीन जागेत भरावी, यासाठी कामगार नेते गजानन पाटील यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.

‘‘भाजीमंडईबाबत नगरपालिका मीटिंगमध्ये निर्णय होईल. नगरपालिकेची 22 फेब्रुवारीला मीटिंग आहे. त्यावेळी याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ. तोपर्यंत व्यापाऱयांनी शिस्त पाळून आहे त्या जागेवर बसावे. निर्णय झाल्यावर पुढील दिशा ठरवू.’’

– निशिकांत पाटील, नगराध्यक्ष.