
मुंबई शहर जिल्ह्याच्या 2021-22च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 124 कोटी 12 लाख रुपयांच्या प्रारूप आराखडय़ास आज मान्यता देण्यात आली.
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. 2121-22 च्या प्रारूप आराखडय़ात सर्वसाधारण योजनेसाठी 104 कोटी 72 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 19 कोटी 28 लाख रुपये, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेसाठी 12 लाख 11 हजार रुपये अशी एकूण 124 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखडय़ास मान्यता देण्यात आली.
या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, खासदार अरविंद सावंत, आमदार अमिन पटेल, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते. जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी प्रास्ताविक करून बैठकीची माहिती दिली.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे, खासदार राहुल शेवाळे, आमदार मनीषा कायंदे, आमदार अजय चौधरी यांच्यासह इतर नगरसेवक व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते.
राज्य सरकारची मदत
मुंबई शहराच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. यासाठी राज्य सरकारची मदत लागल्यास तातडीने देण्यात येईल. यासाठी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या सूचना असल्यास सरकारला कळवावे असे आवाहन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.




























































