धक्का देऊन हुज्जत घालत 1 लाखाची सोनसाखळी हिसकाविली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे दुचाकीला पाठीमागून धक्का देऊन हुज्जत घालत दोन चोरट्यांनी एकाच्या गळ्यातील 1 लाख 8 हजारांची सोन्याची चेन हिसकावून नेली. ही घटना काल रात्री नउच्या सुमारास सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयानजीक वडगाव बुद्रुकमध्ये घडली.

याप्रकरणी 43 वर्षीय स्टेशनरी विक्रेत्याने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी यांचे स्टेशनरी विक्रीचे दुकान आहे. काल रात्री नउच्या सुमारास ते सिंहगड रोड क्षेत्रीय परिसरातून जात होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला धक्का दिला.

त्यामुळे फिर्यादी आणि चोरटे एकमेकांशी वादावादी घालत होते. त्यानंतर चोरट्यांनी फिर्यादी यांच्यासोबत हुज्जत वाढवून त्यांच्या गळ्यातील 1 लाख 8 हजारांची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वैशाली शिंदे तपास करीत आहेत.