मुंबईत 25 टक्के लसीकरण पूर्ण, लसीकरण केंद्रे वाढल्यामुळे दर दिवशी 80 टक्के लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेने वेग घेतला असून आतापर्यंत 25 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणाची केंद्रे वाढल्यामुळे दर दिवशी 80 टक्क्यांपर्यत लसीकरण करणे शक्य झाले आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईसह राज्यभरात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सुरुवातीला मुंबईसह राज्यात को-वीन या केंद्र सरकारच्या ऍपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर मात्र लसीकरणाने वेग घेतला. गुरुवारपासून फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यत आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मिळून 75 हजार 751 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शनिवारी 8 हजार 575 आरोग्य कर्मचाऱयांपैकी 4 हजार 407 जणांनी लस घेतली. त्यातील 7 जणांमध्ये सौम्य दुष्परिणाम दिसले.

लसीकरणाची 21 केंद्रे कार्यरत

मुंबईतील लसीकरण केंद्रांची संख्या आता 21 असून त्यात 114 बुथ कार्यरत आहेत. सध्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यातील 108 पैकी 85 बुथ हे आरोग्य कर्मचाऱयांसाठी तर 23 बुथ हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.