भाविकांना आंगणेवाडी यात्रेत प्रवेश नाही! आंगणे कुटुंबीय पदाधिकारी व पालकमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवणमधल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा 7 मार्च रोजी होणारा जत्रोत्सव केवळ वार्षिक धार्मिक विधी पूर्ण करत साजरा करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.

यात्रेकरू भाविकांना तसेच यात्रा परिसरात बाहेरील व्यापारी वर्गाला यात्रेत प्रवेश नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंगणे कुटुंबीयांनी यापूर्वीच मर्यादित स्वरूपात यात्रेबाबत घेतलेल्या निर्णयावर शासन-प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे.

सोमवारी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडीचे पदाधिकारी व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला अनुसरून ‘माझी जत्रा, माझी जबाबदारी’ या भावनेने सर्वांनी जत्रोत्सवाबद्दल घेतलेल्या निर्णयाला सहकार्य करावे. आंगणे कुटुंबीयांनी यात्रा कालावधीत होणाऱ्या धार्मिक विधी साठी जिल्हा प्रशासनाची आवश्यक ती परवानगी घेणे आवश्यक राहील. असे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान यापूर्वीच 29 डिसेंबर 2020 रोजी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी देवीच्या हुकमाने यात्रेची तारीख निश्चित केली होती. तसेच यात्रोत्सव आंगणेवाडी ग्रामस्थां पुरता मर्यादित ठेवण्यात आल्याचे जाहीर केले होते. कोरोना पार्श्वभूमीवर देवीच्या भक्तांनी यावर्षी यात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी न येता आपल्या घरूनच देवीचे मनोमन स्मरण करत प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या कोरोना संबंधित नियमांमुळे बाहेरील भक्तांना यात्रा कालावधीत देवीचे दर्शन तसेच यात्रोत्सवासाठी आंगणेवाडीत येता येणार नसल्याचे अधिक स्पष्ट झाले आहे.

देश विदेशातील श्री भराडी देवीच्या भक्तांना उत्सुकता असते ते देवीच्या वार्षिकोत्सवाची अर्थात जत्रोत्सवाची. हा जत्रोत्सव कोणत्याही तिथी अथवा तारखेवर होत नाही तर देवीचा कौल घेऊन जत्रेची तारीख निश्चित करण्यात येते. विविध क्षेत्रातील अनेक महनीय व्यक्ती या जत्रोत्सवास उपस्थिती दर्शवतात व देवीचे आशीर्वाद घेतात.

मात्र यावर्षी भाविकांच्या होणाऱ्या गैरसोयी बद्दल दिलगीरी व्यक्त करतानाच आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री देवी भराडी मातेस आपलं सांगण सांगावं, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल. अशी नम्र विनंती आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या वतीने भाविकांना करण्यात आली आहे.