अमरावती तालुक्यात कठोरा बु. ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती तालुक्यातील कठोरा बु.ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. सरपंचपदी मंगेश महल्ले तर उपसरपंचपदी संगीता भालेराव यांची प्रत्येकी 8 मतांनी विजय मिळविला आहे. कठोरा ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक झाली. मंगेश महल्ले यांच्याविरोधात राम खंडार यांनी सरपंच पदासाठी अर्ज भरला होता. तर उपसरपंच पदासाठी संगीता भालेराव व कमल खडसे यांनी अर्ज भरला.

11 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मंगेश महल्ले यांना 8 तर त्यांचे प्रतिस्पर्धी राम खंडार यांना 3 मते मिळाली. तीच परिस्थिती उपसरपंच पदाची झाली व अशा तर्‍हेने मंगेश महल्ले व संगीता भालेराव विजयी झाले आहे. सहकार क्षेत्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास महल्ले यांच्या गटाचे मंगेश महल्ले सरपंचपदी विजयी झाले. तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवीण अडसपुरे यांच्या गटाच्या संगीता भालेराव उपसरपंचपदी विजयी झाल्या आहेत.

निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सहकार नेते विलास महल्ले, मनपाचे माजी नगरसेवक शिवसेनेचे दिगंबर मानकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रशांत काळबांडे, मनोहरराव महल्ले, भास्करराव काळबांडे सह गावातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.