
पालघर जिल्हा म्हणून घोषणा झाली तरी आजवर पालघरचा भाग दुर्लक्षित होता, पण आता या जिल्ह्याच्या विकासाचे पर्व सुरू झाले आहे. या जिल्ह्यात पायाभूत सुविधा, अत्याधुनिक आरोग्य सेवा, दळणवळण आणि पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प लवकरात लवकर उभारले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. या सर्व प्रकल्पांना कितीही निधी लागला तरी सरकार तो कमी पडू देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी आज पालघर जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. जामसर येथील बाल उपचार केंद्रातील बालकांची माहिती घेतली. खरबंद येथील अंगणवाडी आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले तसेच धापरपाडा येथील आदिवासी लोकवस्ती आणि पर्यटनस्थळाला भेट देत खडखड धरणाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जव्हार येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.
जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पालघर जिल्हा संपर्पप्रमुख, आमदार रवींद्र फाटक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी, महिला आर्थिक महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, सुनील भुसारा, कोकण विभागाचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त डी. गंगाथरन, सहायक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, पी. नायर तसेच जिह्यातील अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
जव्हारचा पर्यटन विकास
जव्हार हे गिरीस्थान आहे. या भागात पर्यटनाबाबत करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. मुळात या भागातील आदिवासींचा विकास करायचा असेल तर येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आणि शिक्षणावर भर देऊन हे साध्य करता येईल ही बाब उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केली. येथील राजे मुकणे यांच्याशी आपली भेट झाली. त्यांनी संस्थानची जागा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या भागात शिक्षण आणि आरोग्याची चांगली व्यवस्था करता येईल असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा मुख्यालयाच्या इमारतीचे लवकरच लोकार्पण
पालघर जिल्हा मुख्यालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचे लवकरच लोकार्पण केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. जिह्याला चांगला समुद्रकिनारा लाभला आहे. आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या वारली कलेचा वारसा जपूनच त्यांच्या विकासाच्या योजना बनवल्या जातील असे मुख्यमंत्री म्हणाले.
बंद दाराआड विकासावर चर्चा
उद्धव ठाकरे यांनी जव्हार येथे बंद दाराआड अधिकाऱयांशी चर्चा केली. तोच मुद्दा पकडून पत्रकारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग येथे उद्धव ठाकरे यांच्याशी बंद दाराआड झालेल्या चर्चेच्या वादाला तोंड पह्डले होते यावर लक्ष वेधले आणि त्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, होय.. आम्ही अधिकाऱयांसोबत बंद दाराआड विकासावर चर्चा केली.
सायब… माज्या लग्नाला इजास
खडखडपाडा ग्रामपंचायतीत येणाऱया धोपरपाडा या आदिवासी पाडय़ावर रमेश पारधी यांच्या घरकुल आवास योजनेतून बांधलेल्या घराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली व त्यांची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी रमेश यांचा मुलगा विठ्ठल याने बोलताना पूर्वी आमची झोपडी होती, आता घर झाले असे समाधान व्यक्त केले. तसेच विठ्ठल याने सायब माज्या लग्नाला इजास (साहेब.. माझ्या लग्नाला या) असे सांगत लग्नपत्रिका देत निमंत्रण दिले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तुझ्या लग्नाला मी नक्की येईन असा शब्द विठ्ठल याला दिला.
कुपोषणाची समस्या समूळ नष्ट करू!
जव्हारसारख्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. तसेच जिह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याचा आढावाही त्यांनी घेतला. या भागात वर्षानुवर्षे कुपोषणाची समस्या आहे. प्रत्येक वेळी हा विषय येतो तेव्हा तेवढय़ापुरत्या तत्कालीक उपाययोजना केल्या जातात. या जिल्ह्यात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू अर्थात ‘कोवळी पानगळ’ थांबवण्यासाठी आदिवासींना रोजगार, वैद्यकीय सेवा, दळणवळण, उद्योग आणि पर्यटन याचा एकत्रित विचार करून पालघर जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार केला जाईल आणि त्यामुळे प्राथमिक समस्यांसह कुपोषणाचा प्रश्नही मुळापासून नष्ट होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, केवळ जव्हार नव्हे तर संपूर्ण पालघर जिह्याचा विकास करण्याचे स्वप्न मी पाहिले आहे. त्यासाठी या भागातील समस्या जाणून घेतल्या आहेत. ही माझी प्राथमिक भेट आहे. त्यामुळे सवंग घोषणा करणार नाही, पण पालघर जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात झाली आहे असे मी जाहीर करतो.
पालघरमध्ये सगळय़ांची विमाने उतरवू!
पत्रकारांनी राज्यपालांच्या विमानावर प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे यांनी पालघर आणि परिसरातील विकासाची गाडी आपल्याला जलद गतीने रुळावर आणायची आहे. या भागात जमीन चांगली आहे. त्यामुळे येथेही विमानाची एखादी छोटी धावपट्टी उभारू. म्हणजे सगळ्यांचीच विमाने येथे उतरतील, असे खोचक उत्तर दिले.































































