…आता मला सीडी लावावीच लागेल; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-khadse

माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन, असे मागे मी गमतीने बोललो होतो. मात्र, खरोखरच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आता मला सीडी लावावीच लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला दिला आहे.

जामनेर येथे राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजप नेते माजी मंत्री गिरिश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जयंत पाटील यांनी तुमच्यामागे आता ईडी लागू शकते अशी शक्यता व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी ईडी लावली तर मी त्यांची सीडी लावेन असे म्हणालो होते. आता प्रत्यक्षात माझी ईडी चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच मी सीडी लावण्याचे काम करणार आहे, असे सांगत खडसे यांनी मोठय़ा गौप्यस्फोटाचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – जयंत पाटील

भाजपने शेतकरी व कामगार वर्गाला नाराज केले आहे. आगामी निवडणुकीत भाजपला मतदान मिळणे अवघड आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी 10 जागा लढवते. येथे पक्ष बळकट करण्यासाठी खडसे यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्या, असेही त्यांनी सांगितले.