
अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणी टेंडर धारक अधिकृत वाळू व्यवसायिक आक्रमक बनले आहेत. सर्जेकोट ते शेलटी (शेलटी, रेवंडी, तोंडवळी A-9, A-7) हा अधिकृत वाळू टेंडर भाग वगळता कालावल व कर्ली खाडीत चोरीची वाळू मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे सांगताना अनधिकृत वाळू वाहतूक मार्गाची यादी तहसीलदार यांच्याकडे देण्यात आली आहे.
कडक कारवाई करून अनधिकृत वाळू उत्खनन-वाहतूक बंद करण्याची मागणी तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, अनधिकृत वाळू उतखनन – वाहतुकीवर कडक करवाईसोबत प्रसंगी फौजदारी कारवाई केली जाईल. असे आश्वासन मालवण तहसीलदार यांनी दिले आहे.
वाळू व्यवसाईक संघटना कालावल खाडी यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे. संतोष पाटील, मालोजी हडकर, गणेश तोंडवळकर, जयराम कांबळी, नगरसेवक यतीन खोत, युवराज कांबळी, विकास चेंदवणकर, विक्रांत नाईक, सचिन मोर्वेकर, अमित कांबळी, संतोष कुऱ्हाडे, आशिष शेलटकर यांच्या निवेदनावर सह्या आहेत. वाळू व्यावसायिक संघटना जिल्हाध्यक्ष बाबा परब, नगरसेवक यतीन खोत यांनीही तहसिलदार यांच्याशी अनधिकृत वाळू उत्खनन-वाहतूक प्रकरणी चर्चा केली.
कोरोना काळात सर्वांचीच आर्थिक स्थिती बिकट बनली असताना गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रॉयल्टी दर दुप्पट झाला. मागणी करूनही दर कमी झाले नाहीत. कोणताही अन्य व्यवसाय नसल्याने दागिने गहाण ठेवून, कर्ज काढून वाळू व्यवसाईकांनी वाळू टेंडर घेतली. मात्र अनधिकृत वाळू सुरूच असल्याने त्याचा परिणाम टेंडर धारक अधिकृत वाळू व्यवसायावर होत आहे.
निवेदनात म्हटल्या प्रमाणे अधिकृत वाळू उत्खनन ठिकाणे वगळता कालावल कर्ली खाडीत चोरीची वाळू मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चोरीच्या गाड्या एलपी, डंपर याद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक होत आहे. कणकवली-कसाल मार्गे पहाटे २ ते ६ दरम्यान तसेच ओझर मार्गे गोवा गाड्या सुरू आहेत.
तरी या गाड्यांवर, वाळू उत्खनन जागेवर व बोटींवर दंडात्मक कारवाई झाल्याशिवाय चोरटी वाळू बंद होणार नाही. सदर कारवाई तातडीने व्हावी. अन्यथा टेंडर घेणे मुश्किल होऊन वाळू पासची पुस्तके सरकार दरबारी जमा करून रॉयल्टी परत घ्यावी लागेल. कारवाई न झाल्यास आम्हाला आंदोलन मार्ग स्वीकारावा लागेल. याला प्रशासन जबाबदार असेल. असेही निवेदनात म्हटले आहे.
त्या बरोबर, रॉयल्टी दर कमी करून मिळावा. पावसाचे चार महिने वगळता आठ महिने वाळू उत्खनन टेंडर सुरू ठेवावे. अशीही मागणी करण्यात आली आहे.
महसूल यंत्रणेला कारवाईचे आदेश, स्वतःही कारवाईत उतरणार – तहसीलदार
काही दिवसांपूर्वी हडी-तेरई खाडी मार्गावर वाळू पट्ट्यांची पाहणी करण्यात आली आहे. या बरोबर अनधिकृत वाळू उत्खनन वाहतुकीवर करडी नजर ठेवली जात आहे. तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार धडक कारवाई केली जाणार आहे. दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपात कारवाई होणार आहे. तरी अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्यास ते बंद करून टेंडर घेऊन अधिकृत व नियमानुसार सर्वांनी वाळू उत्खनन-वाहतूक करावी. असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.


























































