
आपल्याला नोकरी हवी असते, रोजगार हवा असतो, कधी संधी समोर चालून येते, तर कधी मेहनत करावी लागते. कधी आवडती नोकरी मिळते तर कधी नावडती नोकरी मिळते. तुम्ही ज्या क्षेत्रात नोकरी कराल, त्या क्षेत्रात नंबर वन बना, प्रोफेशनल बना. त्याच जागेवर न थांबता पुढील तीन वर्षात प्रमोशन कसे होईल याकरीता मेहनत करा, असे शिवसेना नेते, पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तरुणांना सांगितले.
आज आमदार भास्कर जाधव यांनी नोकरी महोत्सवातून रोजगार निर्माण करुन देत अनेकांच्या चुली पेटवण्याचे मोठे काम केले आहे. राजकारणात आगी लावणे खूप सोपे असते पण एखाद्याच्या घरातील चूल पेटवणे हे खूप महान कार्य आहे, असे सांगत शिवसेना नेते, पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणातील तरुणांना कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटावर मात करत लढण्याचा एक आत्मविश्वास दिला आहे.
आपल्या आजूबाजूला जे देश आहेत त्यांच्याकडील समुद्रकिनार्यांपेक्षा दहा पटीने सुंदर कोकणातील समुद्रकिनारे आहेत. पर्यटनातून कोकणात रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचसाठी आम्ही बीचशॅक्स, आंबा महोत्सव, कृषी पर्यटन, मान्सून महोत्सवाचे आयोजन करुन कोकणात जगभरातून पर्यटक कसे येतील याकरीता प्रयत्न करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. गुहागर विधानसभा मतदार संघातील रामपूर येथील मिलींद हायस्कूलच्या मैदानावर आयोजित सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शिवसेना नेते, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांमध्ये पर्यटनामधून विकास करण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्याकरीता विमानतळ आणि जेटीचीही आम्ही उभारणी करत आहोत. मोठ्या संख्येने जगभरातील पर्यटक कोकणात कसे येतील याकरीता मी दिवसरात्र विचार करत असतो. फक्त विचारच नाही तर त्यावर कामही आम्ही सुरु केले आहे. त्याचबरोबर नवीन उद्योग टेक्स्टाईल पार्क उभारले जाईल. असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. पर्यटनातूनच मोठ्या प्रमाणात कोकणात रोजगार निर्मिती होऊ शकते, असेही ते म्हणाले.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी शिवाई प्रतिष्ठान व यशस्वी अॅकेडमी फॉर स्कील यांच्या संयुक्त विद्यमाने रामपूर येथील मिलींद विद्यालयाच्या पटांगणात सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री अॅड.अनिल परब, नोकरी महोत्सवाचे आयोजक आमदार भास्कर जाधव, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, आमदार शेखर निकम, योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष महेश नाटेकर, शिक्षण सभापती सुनील मोरे, माजी सभापती अरुण कदम आदी उपस्थित होते. सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवात दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. सकाळी 9 वाजल्यापासून मिलींद हायस्कूलच्या मैदानावर उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या.
मेहनतीत कमी पडू नका
आज तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे. आता ही नोकरी मिळाली आहे. थोडे दिवस करु़ मग बघू काहीतरी असा विचार करु नका. जी नोकरी मिळाली आहे त्यात कष्ट करा. नेहमी मोठी स्वप्ने पहा. आज आपण ज्या ठिकाणी नोकरी करत आहोत त्याठिकाणी कष्ट करा. प्रमोशन मिळवा. एक दिवस आपण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष कसे होऊ या दृष्टीने मेहनत करा. जगातील सर्वोत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करा. प्रोफेशनल बना. आज सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सवासाठी एका तासात 11 हजार अर्ज आले ही काही चांगली गोष्ट नाही. मी स्वतः वरळीमध्ये पोलीस भरती शिबीर घेतले होते. त्यावेळीही सभागृह तुडूंब भरुन बाहेर उमेदवार उभे होते. आज नोकरीसाठी तरुण काहीही करायला तयार आहे, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीची नियुक्ती पत्रे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली़
पर्यावरणाला हानी पोहोचवणारे उद्योग नकोत – अॅड.अनिल परब
रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड.अनिल परब यावेळी म्हणाले की, कोरोनाच्या भीषण संकंटामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. अनेकजण बेकार झाले. पुन्हा एकदा रोजगार निर्मितीसाठी राज्यसरकार उद्योगधंद्यांना चालना देत आहे. अनेक उद्योग राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोकणात पर्यावरणाला हानी न पोहोचवणारे उद्योग आले पाहीजेत. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. गुहागर आणि दापोली या दोन तालुक्यात पर्यटनवाढीची खूप मोठी संधी आहे. त्यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याठिकाणी रस्ते चांगले करण्याचा निर्णय जिल्हा नियोजनच्या बैठकीत घेतला असल्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी यावेळी सांगितले. सहा हजार तरुणांना रोजगार म्हणजे सहा हजार कुटूंबांना आर्थिक मदत असल्याचे महान कार्य याठिकाणी घडणार आहे असे अनिल परब यांनी सांगितले.
सहा हजार तरुणांना रोजगार देणार – भास्कर जाधव
सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवातून सहा हजार तरुणांना नोकरी मिळवून देण्याची घोषणा आयोजक आमदार भास्कर जाधव यांनी केली. ते म्हणाले की, यापुर्वीही आम्ही याच ठिकाणी सुवर्णभास्कर नोकरी महोत्सव घेतला होता. त्यावेळी इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिले होते. आता मात्र सर्वच क्षेत्रातील तरुणांना आम्ही रोजगार मिळवून देणार आहोत. भविष्यात आणखी काही उपक्रम आम्ही राबवणार असून त्यामध्ये महिला मेळावा, समाजकल्याण विभागाचा मेळावा, अल्पसंख्यांक मेळावा आयोजित करणार आहोत.
मास्क कोणी घातला नाही
भाषणाच्या सुरुवातीलाच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन प्रश्न विचारले की मास्क कोणी कोणी घातलाय, मास्क कोणी कोणी हनुवटीवरच घातलाय. त्यानंतर प्रत्येकांनी मास्क पटापट घातले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कोवीड अजून गेला नाही. त्यामुळे मास्क वापरणे गरजेचे आहे. हे आपण दुसर्यासाठी करत नसून आपण आपल्यासाठी करत आहोत याची जाणीव त्यांनी सर्वांना करुन दिली.





























































