
पवई येथील आयआयटी मुंबईच्या आयोजनाखाली घेण्यात आलेली ‘गेट 2021’ परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली. देशभरातून सुमारे 9 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 78 टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. इंजिनीयरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली होती. या परीक्षेला एकूण 27 विषयांचे पेपर होते. यंदा त्यात एन्व्हायरनमेंटल स्टडीज आणि इंजिनीयरिंग अॅण्ड ह्यूमॅनिटीज या दोन नव्या विषयांचा समावेश करण्यात आला होता. या दोन नव्या विषयांचे पेपर प्रत्येकी सुमारे 14 हजार विद्यार्थ्यांनी दिले. 6, 7, 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी गेट परीक्षा घेण्यात आली. तत्पूर्वी दोन दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर सुरक्षेची तयारी करण्यात आली होती. देशभरातील 200 शहरांमधील 616 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. यंदा गेट परीक्षेच्या राष्ट्रीय समन्वयक मंडळात आयआयटी मुंबईसह दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मद्रास आणि रुरकी येथील आयआयटी संस्था तसेच बंगळुरू येथील आयआयएससी या संस्थेचा समावेश होता.
























































