
मुंबई महापालिका शेकडो किलोमीटर अंतरावरून मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा करते. हे पाणी मुंबईत शुद्ध स्वरूपात येते. मात्र, मुंबईत आल्यानंतर काही वेळा इमारतीची भूमिगत आणि गच्चीवरील टाकी अस्वच्छ असल्यामुळे हे पाणी दूषित होते. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकरांनी त्यांच्या इमारतीच्या टाक्या वर्षांतून दोनदा साफ कराव्यात आणि त्यानंतर पाण्याचे नमुने पुन्हा तपासावेत, अशी सूचना मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईकरांना केली आहे.
पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी महापालिका मुंबईकरांना कंत्राटदारांचाही पर्याय उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी तीन पातळ्यावर धोरण ठरवले जाणार आहे. पहिल्या पातळीत संबंधीत कंपनी अथवा कंत्राटदारासाठी निकष ठरवण्यात आले आहे.



























































