
काळेवाडी येथे घरात झोपलेल्या दोन महिलांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून त्यांचा खून केला. ही घटना 15 ऑक्टोबर 2020 रोजी घडली. घटनेला चार महिने उलटून गेले. मात्र पोलिसांच्या हाती अजूनही ठोस काहीच लागलेले नाहीत.
त्यामुळे पोलिसांनी खून झालेल्या महिलेचा मुलगा, सून आणि अन्य दोघांचे ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची विशेष परवानगी देखील पोलिसांनी घेतली आहे. छाया पांडुरंग गुंजाळ (वय 50), मंगल साहेबराव सत्वधर (वय 48) अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत.
15 ऑक्टोबर रोजी रात्री मयत छाया, त्यांच्या सुनेची आई मयत मंगल, छाया यांचे पती आणि सासू असे चौघेजण घरातील हॉलमध्ये झोपले होते. आतल्या खोलीत छाया यांचा मुलगा आणि सून झोपले होते. छाया यांची सासू भाजी विक्रीचा व्यवसाय करते. त्यामुळे पहाटे चार वाजताच्या सुमारास छाया यांची सासू भाजी खरेदीसाठी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली. त्यावेळी घराचा दरवाजा उघडाच होता.
दरम्यान, घरातील व परिसरातील लाईट गेले. अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात हल्लेखोरांनी उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून छाया आणि त्यांच्या सुनेची आई मंगल यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात छाया यांचा जागीच मृत्यू झाला. तर मंगल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. प्राथमिक चौकशीत काहीच निष्पन्न न झाल्याने परिसराती सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु झाली. त्यात दिसणाऱ्या प्रत्येक संशयितांची तपासणी केली. तरीही पोलिसांना धागेदोरे सापडेनात. दरम्यान पोलिसांनी एक हजार 600 जणांचे कॉल डिटेल्स तपासले. त्यातही काही मिळाले नाही.
त्यामुळे पोलिसांनी आता वैद्यकीय चाचण्या करण्याचा पर्याय निवडला आहे. मयत छाया यांचा मुलगा, त्यांची सून आणि अन्य दोघांचे ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. यातून पोलिसांच्या हाती काहीतरी लागेल अशी आशा वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी डॉ. विवेक मुगळीकर यांनी व्यक्त केली आहे.





























































