पोलीस दलाच्या बिनतारी यंत्रणेचे साहित्य लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, चोरट्यांनी आता पोलिसांनाच आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर डोंगररांगेतील बाळेश्वर मंदिरातील जिल्हा पोलीस दलाच्या बिनतारी संदेश यंत्रणेतील महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे. दरम्यान, या यंत्रणेच्या सुरक्षेसाठी रक्षकही तैनात केलेला असतो. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. असे असतानाही चार चोरट्यांनी सर्व कॅमेऱ्यांची तोडफोड करून चोरी केली आहे.

चोरट्यांनी बिनतारी यंत्रणेच्या नियंत्रण कक्षात प्रवेश करून दोन रिपिटर, तीन चार्जर, इंटरनेट राऊटर, मायक्रोवेव्ह लिंक व अन्य साहित्य असा एकूण 3 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी तेथून पोबारा केला. सकाळी ही बाब उघड झाल्यानंतर घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबतची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर नाशिक बिनतारी संदेश विभागाचे उपअधीक्षक गजानन शेलार, संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, घारगावचे प्रभारी निरीक्षक पांडुरंग पवार, नगरच्या बिनतारी संदेश विभागाचे पोलीस उपनिरीक्षक डी. बी. ताम्हाणे, घारगावचे उपनिरीक्षक डी. पी. राऊत आदींनी घटनेची माहिती घेतली.