धक्कादायक…हप्ता भरण्यास सांगितल्याने कर्जदाराने केला बजाज फायनान्सच्या मॅनेजरचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

थकित कर्जाचा हप्ता भरण्यास सांगितल्याचा राग आल्यामुळे ट्रक चालक कर्जदाराने बजाज फायनान्सच्या सेल्स मॅनेजरचा खून केला आहे.  पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

रवींद्र प्रकाश वळकुंडे (वय 28) असे खून झालेल्या फायनान्स मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी राहुल लक्ष्मण गाढवे याला अटक केली आहे. अमोल भीमराव जोगदंड यांनी फिर्याद दिली आहे.

उरळीकांचन परिसरातील एका इमारतीत बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. आरोपी राहुल गाढवे ट्रकचालक असून त्याने बजाज फायनान्स मधून कर्ज घेतले होते.  कर्जाचे हप्ते  भरावेत यासाठी मॅनेजर रवींद्र वळकुंडे यांनी राहूलकडे पाठपुरावा केला होता.

याच कारणावरून आरोपी राहूलने काल सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास बजाज फायनान्सच्या  कार्यालयात जाउन फोनवर बोलत असलेले मॅनेजर रवींद्र वळकुंडे यांच्यावर कोयत्याने  वार केले. त्यामुळे गंभीररित्या  जखमी झाल्याने रवींद्र  यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

कर्जाचे हप्ते जमा करण्यासाठी संबंधित सेल्स मॅनेजरने आरोपीकडे पाठपुरावा केला होता. त्याचा राग आल्यामुळे आरोपी राहूलने त्यांच्यावर कोयत्याने वार केला. त्यामुळे रवींद्र वळकुंडे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. – सूरज बंडगर, पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे.