
पुदुचेरीतील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील नारायणसामी सरकारचे भवितव्य संकटात सापडले आहे. काँग्रेस-डीएमके आघाडीच्या आणखी दोन आमदारांनी रविवारी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सादर केला. विधानसभेत 22 फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्याआधीच मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यासाठी हा मोठा झटका बसला आहे.
काँग्रेसचे आमदार के. लक्ष्मीनारायणन आणि डीएमकेचे आमदार वेंकटेशन यांनी रविवारी विधानसभा अध्यक्ष व्ही.पी. शिवकोलुंधू यांची भेट घेतली व त्यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सादर केला. या दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे 33 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-डीएमके आघाडीच्या आमदारांची संख्या घटून 11 झाली आहे, तर विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या 14 आहे. नारायणसामी सरकारने बहुमत गमावले आहे. मी आमदारकीबरोबरच पक्षसदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे, असे लक्ष्मीनारायणन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. वेंकटेशन यांनी आपण मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्यामुळे आमदारकीचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. याआधी काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिला आहे.
























































