खराडी चौकात पीएमपीएमएल बसला लागलेल्या आगीत तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएमपीएल बस आणि दुचाकीस्वाराची धडक झाल्यामुळे लागलेल्या आगीत तरूणाचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास पुणे- नगर रस्त्यावरील खराडी बायपास चौकाजवळ घडली. आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. अजिंक्य येवले (वय 26) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

सोमवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास खराडी बायपास चौकाजवळ पीएमपीएमएल बस आणि दुचाकीची धडक झाली. त्यामुळे दुचाकीस्वार अजिंक्य बसखाली अडकला. अपघातानंतर सीएनजीवर चालणाऱ्या बसने अचानक पेट घेतला. काही मिनिटांमध्ये संपूर्ण बसला आगीच्या ज्वाळांनी वेढले होते. तत्पुर्वी बसमधील प्रवासी वेळीच खाली उतरल्याने कुणीही जखमी झाले नाही. मात्र बसच्या खाली अडकलेल्या दुचाकीस्वार अजिंक्यचा मृत्यू झाला.

बसला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि विमानतळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने अग्निशमक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. भर रस्त्यात बसने पेट घेतल्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. परिसरात स्थानिक नागरिकांनी आणि वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.