
देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केले. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि 9 काडतुसे असा मिळून 1 लाख 24 हजारांचा ऐवज जप्त केला. आर्म अॅक्ट कलमानुसार त्यांच्याविरूद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश दत्तात्रय शिर्के (वय 29, रा. सांगवी सांडस, हवेली ) आणि राहूल गणपत ढवळे (वय 29, रा. राहू पिंपळगाव, दौंड ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सिंहगड रस्ता परिसरातील एका मंगल कार्यालयानजीक दोघेजण संशयास्पद थांबले असून, त्यांच्याकडे पिस्तूल आणि काडतुसे असल्याची माहिती पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून निलेश आणि राहूलला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक पिस्तूल आणि 9 काडतुसे मिळून आली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, शाहिद शेख, दिलीप जोशी, नीलेश शिवतरे, अतुल मेंगे, गणेश पाटोळे, सुमित ताकपेरे, ऋषीकेश कोळप, चेतन होळकर यांच्या पथकाने केली.

























































