
भर रस्त्यात मोटर सायकलवर स्टंट करत असताना रस्त्याच्या बाजूला होण्यास सांगीतल्याच्या कारणावरुन धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आल्याची घटना शहरातील राजीव गांधी चौकाजवळ घडली. या प्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कृष्णा लक्ष्मीकांत कांबळे रा.खोरी गल्ली लातूर याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की फिर्यादी हा आपल्या आई, वडील आणि दोन बहिणांसोबत बिदर येथील एक लग्न समारंभ करुन परत येत होता. राजीव गांधी चौकाजवळ त्यांच्या कारच्या समोर मोटारसायकलवर दोन युवक स्टंट करत होते. त्यामुळे त्यांनी कार थाबवून रस्त्याच्या कडेला होण्यास सांगीतले असता चेंड्या उर्फ जगदीश राठोड वय 20 रा. कन्हेरी तांडा आणि त्याचा एक साथीदार यांनी धारदार शस्त्राने सिध्दार्थ अशोक कांबळे याच्या गळ्यावर, गालाजवळ, छातीवर वार करुन जखमी केले. तसेच फिर्यादीच्या आई,वडील, बहिणींना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. कारचे नुकसान केले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































